मुख्यमंत्री ठाकरे आणि नाईक कुटुंबात जमिनीचे २१ व्यवहार

-किरीट सोमय्या

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्या कुटुंबात जमिनीचे 21 व्यवहार झाल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी अन्वय नाईक कुटुंबियांसोबत नेमके काय संबंध आहेत हे जाहीर करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. तसेच जमिनीचे व्यवहार झाल्याचे सिद्ध करणारी कागदपत्रेही सोमय्या यांनी सादर केली आहेत.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत सोमय्या म्हणाले की, 21 सातबारा उतारे आम्ही शोधून काढले आहेत. यामध्ये जमिनीचे व्यवहार झाले आहेत. असे किती व्यवहार उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक कुटुंबाचे झाले आहेत? जमिनी घ्यायच्या आणि विकायच्या हा उद्धव ठाकरेंचा व्यवसाय आहे का? रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे की ही गुंतवणूक आहे याची माहिती आम्हाला हवी आहे.

काहीही संबंध नसणारी दोन कुटुंब एकत्र येतात आणि जमिनीचे आर्थिक व्यवहार करतात आणि आपल्या पत्नीचे नाव देतात याच्या मागचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न मी कालपासून करत आहे. मी पण महाराष्ट्राचाच एक नागरिक आहे तर मला समजवून सांगणार का? रश्मी ठाकरे आणि मनिषा रविंद्र वायकर यांच्यातही काय संबंध आहे? एकत्र येण्यामागचे प्रयोजन काय हा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे. तुम्ही सामान्य नागरिक नाही तर मुख्यमंत्री आहात म्हणून हे प्रश्न विचारत आहोत, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचे इतर काही व्यवहार आहेत हे महाराष्ट्राची जनता समजू शकते. ते मित्र, नातेवाईक असू शकतात; पण आम्हाला त्याबद्दल सांगा. शेतजमिनीचा व्यवहार झाला की राज्यातील जनतेच्या मनात अनेक शंका निर्माण होतात, असा उपहासात्मक टोला त्यांनी लगावला.

रेवदंडामध्ये माझ्या सासूरवाडीपासून थोड्या अंतरावर जमीन असल्याने मला याबद्दल माहिती आहे. मी यासंबंधी तलाठी, तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्याशी बोललो. रायगडचे एसपी जे अन्वय प्रकरणाचा फेरतपास करत आहेत ते आर्थिक व्यवहार झाल्याचे माहिती नसल्याचे सांगतात. जिल्हाधिकारी आरटीआय करा, माहिती काढतो सांगतात, असे किरीट सोमय्यांनी म्हटले आहे.