बेशुद्ध मुलाला मृत समजून गोणीत भरून फेकलं आणि जिवंत मुलाचा गुदमरून मृत्यू झाला

Police investigation
पोलीस तपासात गोणी आढळली

घरी खेळण्यासाठी येणारा ४ वर्षांचा मुलगा अचानक बेशुद्ध पडल्यामुळे आपले नाव घेतले जाईल, या भीतीने १७ वर्षाच्या मुलीने मुलाला गोणीत भरून गोणी घराच्या खिडकीतून फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईतील घणसोली येथे उघडकीस आला आहे. बराच वेळ गोणीत राहिल्यामुळे श्वास गुदरमरून मुलाचा मृत्यु झाला असून पोलिसानी १७ वर्षाच्या मुलीवर गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. जर वेळीच या मुलीने शेजाऱ्यांना याची कल्पना दिली असती तर कदाचित त्या लहान मुलाचे प्राण वाचले असते आणि या मुलीचा तुरुंगवासही टळला असता, अशी भावना इमारतीमधील रहिवासी व्यक्त करत आहेत.

नवी मुंबईतील घणसोली येथील बाळाराम वाडी येथे राहणारा ४ वर्षाचा ओंकार हा १८ सप्टेंबर रोजी राहत्या इमारतीतून अचानक बेपत्ता झाला होता. त्याचा शोध सुरू असताना दोन तासांनी इमारतीच्या मागच्या बाजूला ओंकारचा मृतदेह एका गोणीत आढळून आला होता. राबोडी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. दरम्यान राबोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तपास सुरू केला.

ओंकार राहत असलेल्या परिसरात पोलीस पथक चौकशी करीत असताना त्याच इमारतीत राहणारी १७ वर्षाची मुलगी पोलीस चौकशीसाठी समोर आली. तिच्या चेहऱ्यावर भीतीची लकेर उमटत असल्याचे पोलिसांच्या नजरेने ओळखले. दरम्यान महिला पोलीस अधिकारी तसेच वरिष्ठ अधिकारी यांनी तिच्यावर सतत पाळत ठेवली. अखेर संशयावरून तिच्याकडे चौकशी सुरू केली असता तीने पोलिसांकडे गुन्ह्याची कबुली दिली.

Ghansoli crime scene
घणसोली येथील इमारत

ओंकार हा दररोज शेजारी राहणाऱ्या मुलीच्या घरी दुपारचा खेळायला जायचा. १८ सप्टेंबर रोजी तो खाली खेळायला गेला, त्यानंतर तो पहिल्या मजल्यावरील मुलीच्या घरी खेळायला आला. खेळता खेळता अचानक तो बेशुद्ध पडला. ओंकारला अचानक काय झालं? म्हणून तीने त्याला हलवले त्याची काहीच हालचाल होत नसल्यामुळे तो मृत झाला असे समजून घाबरलेल्या मुलीने बेशुद्ध झालेल्या ओंकारला गोणीत भरून ती गोणी तिच्या घराच्या खिडकीतून इमारतीच्या मागच्या बाजूला फेकून दिली, अशी धक्कादायक माहिती या मुलीच्या चौकशीत पुढे आली. राबोडी पोलिसांनी १७ वर्षांच्या मुलीला अटक करून तिची रवानगी महिला बाल सुधारगृहात करण्यात आली असल्याची माहिती पोनि. गिरीधर गोरे यांनी दिली.