सुशांत सिंह प्रकरण : मुंबई पोलिसांच्या बदनामीमागे भाजप आयटी सेल

anil deshmukh
गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आरोप

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण भाजपने हाइप करून त्याला वेगळे वळण दिल्याचा दावा अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठाने केला असल्याची माहिती देत महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी इतक्या खालच्या स्तरावर उतरलेल्या भाजपने राज्यातील जनतेची माफी मागितली पाहिजे, अशी जोरदार मागणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच मुंबई पोलिसांच्या बदनामीमागे भाजप आयटी सेलचा हात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

गृहमंत्र्यांनी सुशांत प्रकरणात भाजपने केलेल्या एकेका कृतीचा समाचार घेत यामागे केवळ एका व्यक्तीची, अधिकार्‍याची नव्हे तर महाराष्ट्राची बदनामी करण्याचा कट होता, असा गंभीर आरोप केला. विविध अस्त्रांचा वापर करत भाजपने हे प्रकरण अत्यंत क्लिष्ट केले. जगातील माध्यमांनी यावर आपले वृत्तांकन केले. तेव्हा या प्रकरणामागचे सत्य उलगडण्यासाठी अमेरिकच्या मिशिगन विद्यापीठाने या घटनेचा अभ्यास करून त्यावर अहवाल दिला आहे. भाजपने हे प्रकरण केवळ हायजॅक केले असे नाही तर त्याला अत्यंत गंभीर वळण देण्याचा प्रयत्न केला. त्याला वेगळे वळण देऊन हे प्रकरण वेगळ्याच दिशेला नेण्यामागे भाजपचेच नेते होते, असा आरोप देशमुख यांनी केला. माध्यमातील काही संस्थांनी यात तेल ओतण्याचे काम केल्याचे देशमुख म्हणाले. ज्यांनी या बदनामीच्या सत्रात उघड उडी घेतली त्या मीडियातील संस्थांची नावेही मिशिगनच्या या अहवालात देण्यात आली असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.

सुशांत प्रकरणाचे निमित्त करून या पक्षाने महाराष्ट्राला बदनाम करण्याची सुपारी उचलली होती. महाराष्ट्राच्या अस्मितेला शिव्या देण्याचे पध्दतशीर काम या निमित्ताने करण्यात आले. बाहेरच्या राज्यातील कठपुतलींनाही आपल्या तालावर नाचवण्याचे काम या पक्षाने केले, असा आरोप त्यांनी केला. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा प्रोफेशनली तपास केल्याचा उल्लेख करत सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या तपासाला योग्य ठरवले. पण राज्याचे पाच वर्षे नेतृत्व करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवला.

पांडेंचा प्रचार करणार का?
बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राची बदनामी केली. आता ते निवडणूक लढवत आहेत. देवेंद्र फडणवीस त्यांच्या पक्षाच्या बिहार राज्याचे प्रभारी आहे. ज्यांनी महाराष्ट्राची बदनामी केली त्या पांडेंचा प्रचार फडणवीस करणार आहेत काय, असा सवाल अनिल देशमुख यांनी केला. एम्स आणि कूपर रुग्णालयाने आपला सुशांत प्रकरणाचा अहवाल नुकताच दिला आहे. या अहवालातून सुशांतची हत्या झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सुशांतच्या शरीरात विष नसल्याचेही आढळून आले आहे. यामुळे सीबीआयने आपला अंतिम अहवाल तात्काळ द्यावा, अशी मागणीही देशमुख यांनी केली आहे.

खोट्या ट्विटर अकाऊंटच्या चौकशीचे आदेश
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूचे भांडवल करण्यासाठी महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांना त्याअनुषंगाने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला बदनाम करून राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यासाठी ताकद लावण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे. यासाठी 80 हजार इतक्या प्रमाणात ट्विटरचे खोटे अकाऊंट उघडण्यात आल्याचे उघडकीस आल्याने भाजपचे धाबे दणाणले आहेत. या खोट्या अकाऊंटप्रकरणी भाजपच्या आयटी सेलवर मुंबई पोलिसांचा रोख असून, त्या दृष्टीने तपास केला जाण्याचे संकेत मुंबई पोलिसांनी दिले आहेत.