अमित शहा बोलले म्हणून मुंबई महापालिका शिवसेनेला सोडली!

चंद्रकांत पाटीलांचा गौप्यस्फोट

डिसेंबर २२ मध्ये होणार्‍या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सारी शक्ती पणाला लावून सत्ता मिळवू पाहणार्‍या भाजपने शिवसेनेला दणका देण्याचे ठरवले आहे. यासाठी भाजपचे सगळेच नेते आतापासूनच शक्ती एकवटू लागले आहेत. मुंबईच नव्हे, राज्यातील महत्वाच्या महानगरपालिकाही भाजपच्या पटलावर आहेत. सत्तेच्या या अपेक्षेने भाजपचे नेते अनेक दावे करू लागले आहेत.

या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. ‘मागच्यावेळी मुंबई महानगरपालिकेची सत्ता भाजपला मिळाली असती. पण, पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या सूचनेवरून भाजपने ही सत्ता शिवसेनेला सोडून दिली. शहा यांनी हा उदारपणा दाखवला नसता तर आज मुंबईची महानगरपालिका आमच्या ताब्यात असती’, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

एका कार्यक्रमानिमित्त चंद्रकांत पाटील पुण्यात आले होते. तेथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील दावा केला. आता आम्ही असली चूक करणार नाही. या निवडणुकीत मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल, असेही ते म्हणाले. मागच्या वेळी आम्ही जेव्हा ८२ जागा जिंकलो तेव्हा महापौर आमचाच बसला असता. परंतू अमित शाह यांनी आपल्याला राज्य चालवायचे असून मुंबई महानगरपालिका शिवसेनेला सोडा, असा सल्ला पदाधिकार्‍यांना दिला होता.