घरताज्या घडामोडीअर्णब गोस्वामींना सुप्रीम कोर्टाकडून जामीन

अर्णब गोस्वामींना सुप्रीम कोर्टाकडून जामीन

Subscribe

तात्काळ सुटकेसाठी न्यायमूर्ती चंद्रचूड यांचे आदेश

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने बुधवारी रिपब्लिकन टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. अर्णब गोस्वामी यांची तात्काळ जेलमधून सुटका करा, असा आदेशही सुप्रीम कोर्टाने रायगड पोलिसांना दिला आहे. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्या. इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठापुढे झालेल्या या सुनावणीदरम्यान, ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी अर्णब गोस्वामी यांची बाजू मांडली. अर्णब यांची ५० हजार जातमुचलक्यावर तळोजा जेलमधून बुधवारी रात्री ८.३० वाजता सुटका क रण्यात आली.

महाराष्ट्र पोलिसांकडून अर्णब गोस्वामी यांना इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी ४ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. या अगोदर याच प्रकरणात मुंबई हायकोर्टाने गोस्वामी यांना अंतिम जामीन देण्यास नकार दिला होता. भारतीय दंड विधानाच्या कलम ३०६ नुसार रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही, असा युक्तिवाद ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी सुप्रीम कोर्टात केला होता.

- Advertisement -

सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती चंद्रचूड यांनीही अर्णब गोस्वामींच्या अटकेवर प्रश्नचिन्ह आणि आश्चर्य व्यक्त केले. सोबतच जामिनास नकार देण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयावरही न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी टिप्पणी केली.

‘आत्महत्या प्रकरण दाखल करण्यासाठी सक्रियरित्या प्रोत्साहीत करावे लागते. जर एखाद्या व्यक्तीवर पैशांचे देणे बाकी असेल तर ते आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचे प्रकरण ठरू शकते का? एका व्यक्तीकडे दुसर्‍या व्यक्तीचे देणे बाकी आहे. आर्थिक तणावाच्या कारणाने दुसर्‍या व्यक्तीने आत्महत्या केली तर हे आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे ठरते का? कलम ३०६ अंतर्गत हा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो का? नाईक यांनी आर्थिक विवंचनेत तणावाच्या कारणाने आत्महत्या केली. ताब्यात घेऊन चौकशी करण्याजोगे हे प्रकरण आहे का?’ अशी टिप्पणी न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी यावेळी केली.

- Advertisement -

एफआयआर प्रलंबित असेल आणि तरीही जामिनासाठी नकार दिला जात असेल तर हा न्यायाचा उपहास ठरेल, असेही न्या. चंद्रचूड यांनी यावेळी म्हटले. मुंबई हायकोर्टाकडून जामीन नाकारण्याबाबत कठोर टिप्पणी करताना, नागरिकांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचे रक्षण करण्यात मुंबई हायकोर्ट अपयशी ठरल्याचे सांगत सुप्रीम कोर्टाने निराशा व्यक्त केली.

किरीट सोमय्यांचे रश्मी ठाकरेंवर आरोप
अर्णब गोस्वामी अटक प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि वास्तू सजावटकार अन्वय नाईक यांच्यात आर्थिक व्यवहार झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील रेवदंडा नजिकच्या किल्ला कोर्लई येथे रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी नाईक कुटुंबाकडून जमीन घेतली, असा दावा किरिट सोमय्या यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी हा व्यवहार का लपवला? मुख्यमंत्र्यांनी रेवदंडाजवळ जमीन का घेतली? असे अजून किती व्यवहार झाले आहेत? असा सवाल किरिट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. त्याचबरोबर ठाकरे आणि नाईक कुटुंबात झालेल्या व्यवहाराची चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही सोमय्या यांनी केली आहे.

…तर मुख्यमंत्र्यांना अटक करणार का?
रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अंतरिम जामिनासाठी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत वकील हरीश साळवे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. काही दिवसांपूर्वी एसटीच्या कर्मचार्‍याने वेतन न मिळाल्यामुळे आत्महत्या केली. मुख्यमंत्र्यांनी पगार न दिल्यामुळे या कर्मचार्‍याला आत्महत्या करावी लागली. मग आता पोलीस उद्धव ठाकरे यांना अटक करणार का, असा सवाल अर्णब गोस्वामी यांचे वकील हरीश साळवे यांनी उपस्थित केला. अर्णब गोस्वामी यांना ज्याप्रकारे अटक झाली, ती अटक करण्याची पद्धत आहे का? अशाप्रकारे अटक करायला अर्णब गोस्वामी हे खुनी किंवा दहशतवादी आहेत का, असा सवाल हरीश साळवे यांनी उपस्थित केला.

आपली लोकशाही असामान्यपणे मजबूत आणि लवचिक आहे. सरकारांना ट्विट्सकडे दुर्लक्ष करुन पुढे गेले पाहिजे. हे निवडणूक लढण्याचे कारण नाही. जर तुम्हाला कोणता चॅनल आवडत नसेल, तर तो पाहू नका. कुणाचेही व्यक्तीस्वातंत्र्य अमान्य करण्यासाठी कोणतेही तांत्रिक कारण सांगितले जाऊ शकत नाही. हे काही दहशतवादाचे प्रकरण नाही.
-न्यायमूर्ती चंद्रचूड, सुप्रीम कोर्ट.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -