तीर्थक्षेत्रांवरील बंदीने पर्यटक व्यवसायाला कोट्यवधी रुपयांचा फटका

महाराष्ट्रातील समुद्र किनारे,गडकिल्ले,अभयारण्ये, लेणी यासह तीर्थक्षेत्रांची संख्याही राज्यात मोठ्या प्रमाणावर आहे. एकाच राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर विविधता असलेल्या पर्यटन स्थळांमध्ये तीर्थस्थळांची संख्या सर्वाधिक आहे. दिवाळीच्या सुट्टीत सर्वाधिक पर्यटक तीर्थक्षेत्रांना भेटी देतात. मात्र, कोरोनामुळे राज्य सरकारने तीर्थक्षेत्र बंदच राहिल्यामुळे महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला आहे. या पर्यटक व्यवसायावर अवलंबून असणार्‍या नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

महाराष्ट्रात दरवर्षी देशाच्या विविध प्रांतांतून चार कोटी आणि परदेशांतून सुमारे 20 लाख पर्यटक येतात. त्यापैकी तीन कोटींहून अधिक पर्यटक राज्यातील पंढरपूर, शिर्डी, शणीशिंगणापूर आदी तीर्थक्षेत्रांना भेटी देतात. आता अनलॉकची प्रक्रिया टप्याटप्याने राज्यसह देशभरात सुरू झाली आहे. मात्र, लॉकडाऊनच्या काळात राज्यातील तीर्थक्षेत्र बंद असल्यामुळे पर्यटन स्थळांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. पर्यटकांना पर्याय नसल्यामुळे सध्या महाराष्ट्रात अ‍ॅग्रोर टुरिझम आणि समुद्र किनार्‍यांना भेट देत आहेत. यामुळे रिसॉर्ट आणि हॉटेल व्यवसाय आता पूर्वपदावर येत आहे. महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र बंद असल्याने त्या आधारित असलेल्या नागरिकांच्या हाताला काम नव्हते. यामुळे त्यांची यंदाची दिवाळी अंधारात गेली आहे. इतर राज्यातील तीर्थक्षेत्रे पर्यटकांसाठी खुली केल्यामुळे महाराष्ट्रातील पर्यटक जयपूर, केरळ, गोवा, विशाखापट्टणम आणि वाराणसीसारख्या ठिकाणांकडे वळत आहेत.

800 कुटुबिंयावर उपासमारीची वेळ
मुंबईची उपनगरीय लोकल सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी अजून सुरू झालेली नाही. याचा मुंबईतील पर्यटनालाही फटका बसला आहे. मुंबईच्या पर्यटनातून शेकडोंच्या संख्येने रोजगार मिळतो. मात्र, लोकलअभावी हा रोजगार बुडाल्यात जमा आहे. वाहन मालक, चालकांपासून हॉटेलचे आचारी, कुली, मदतनीससह गाईडपर्यंतच्या सर्वांचा यात समावेश आहे. कोरोनाच्या संकटामुळे पर्यटन व्यवसाय ठप्प झाल्याने या सर्वांचा रोजगार बुडाला आहे. टूर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स व्यवसाय करणार्‍या 800 कुटुबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.

राज्यात 90 टक्के पर्यटन व्यवसाय हा मंदिरे आणि तीर्थक्षेत्रांवर अवलंबून आहे. मात्र, गेल्या आठ महिन्यांपासून महाराष्ट्रातील मंदिरे आणि तीर्थक्षेत्र बंद आहेत. राज्य सरकारने अनलॉकची सुरुवात केली असली तरी आतापर्यंत मंदिरे आणि तीर्थक्षेत्र सुरू करण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. यामुळे राज्यातील पर्यटन व्यवसायाला फटका बसला आहे. इतर राज्यात मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे सुरू झाल्याने राज्यातील पर्यटक बाहेरच्या राज्यात वळला आहे.
-शैलेश मराठे,व्यवस्थापक, सह्याद्री संस्कृती टुरिझम