भाजपचं मिशन मुंबई महानगरपालिका, या नेत्याला सोपवली प्रभारीपदाची जबाबदारी

Standing committee
प्रातिनिधिक छायाचित्र

दोन वर्षांनी येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली असून २०२२ मधील निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. मनपा निवडणुकीसाठी भाजपने कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांना प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे. आज मुंबईतील प्रदेश कार्यालयात झालेल्या भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत भातखळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, संघटन मंत्री विजय पुराणिक यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते.

मुंबई महानगरपालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. मागच्या दोन निवडणुकीत शिवसेनेला मनसे आणि भाजपचे कडवे आव्हान मिळाले असले तरी सत्ता ताब्यात ठेवण्यात सेनेला यश आलेले आहे. यावेळी शिवसेनेने भाजपचा हात सोडून काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन केल्यामुळे भाजप महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेकडून सत्ता हिसकावून घेण्याच्या प्रयत्नात आहे. त्या अनुषंगाने रणनीती आखण्यास भाजपकडून सुरुवात झाली आहे.

भाजपचे आमदार अतुल भातखळकर हे गेल्या काही महिन्यांपासून भाजपविरोधात आक्रमकपणे टीका करत आहेत. महाविकास आघाडी सरकार आणि खासकरुन शिवसेनेवर त्यांनी कडक शब्दांत ट्विटरद्वारे टीका केलेली आहे. त्यामुळेच त्यांच्याकडे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली असावी, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.