शिवसेनेचा हल्लाबोल!

किरीट सोमय्या यांच्या आरोपांना जशाच तसे उत्तर

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांवर सातत्याने आरोप करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर आता शिवसेनेने जोरदार आघाडी उघडली आहे. शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यासह माजी मंत्री रविंद वायकर, विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोर्‍हे, महापौर किशोरी पेडणेकर यांनी जोरदार हल्ला चढवत त्यांना पुरावे सादर करण्याचे आव्हान देत अन्यथा तोंड काळे करा, असे बजावले आहे.

किशोरी पेडणेकर यांच्यावर सोमय्या यांनी एसआरएमध्ये गाळे घेतल्याचा आरोप केला. या आरोपाचा धागा पकडत सोमय्या यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल केली आहे. त्यांच्या या आरोपाला उत्तर देताना सोमय्या यांना केवळ साडी नेसायचे शिल्लक असल्याचे सांगत पुरावे सादर करा, असे आव्हान दिले. माजी मंत्री आमदार रविंद्र वायकर यांनी सोमय्या यांची अवस्था ना घरका ना घाटका अशी झाली असल्याचे म्हटले आहे.ठाकरे घराण्यावर आणि माझ्यावर आरोप करण्याआधी आधी पुरावे सादर करा, नाहीतर तोंड काळे करा, असे प्रतिआव्हान दिले आहे. हे आव्हान देतानाच त्यांनी ‘30 जमिनींचे व्यवहार अन्वय नाईक कुटुंबासोबत रश्मी ठाकरे यांनी केले आहेत. आणखी माहिती हवी असेल तर देतो, असेही वायकर म्हणाले.

‘आपलं महानगर’शी बोलताना वायकर यांनी सोमय्या यांच्या आरोपांचा समाचार घेतला.मुरुड येथील कोलई गावात जमिनी खरेदी झाली होती. हा व्यवहार कायदेशीर पद्धतीने झाला. निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात याचा उल्लेख आहे. आयकर विभागाला देखील याचा दस्ताऐवज दिला आहे. याशिवाय या प्रकरणाची लोकायुक्तांमार्फत चौकशी झालेली आहे. विरोधकांना आणखी चौकशी करायची असेल तर ते करू शकतात, असे वायकर म्हणाले. अन्वय नाईक यांनी जमीन विकल्यापेक्षा त्यांनी आत्महत्या कोणामुळे केली? याचा शोध घेतला पाहिजे. अर्णब गोस्वामी प्रकरण विरोधकांच्या विशेषत: भाजपच्या अंगाशी आल्याने वाचाळवीर किरीट सोमय्या नसती उठाठेव करत असल्याचा आरोपही वायकर यांनी केला.

जमिनी खरेदीबाबत विचारणा करता त्यांनी सांगितले की, 2014 साली जमिनीचा व्यवहार करण्यात आला. हा व्यवहार नियमानुसारच करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आमचा व्यवहार फक्त अन्वय नाईकांसोबत झाला आहे. आता या व्यवहाराला सहा वर्ष पूर्ण झाली आहेत. म्हणजे फडणवीस यांचे सरकार असताना. मात्र, तेव्हा सोमय्या काही बोलले नव्हते.

जेव्हा रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांनी राजकारण करत हे मुद्दे समोर आणले. त्यांच्याकडे 30 जणांसोबत व्यवहार झाल्याचे पुरावे असल्यास सोमय्यांनी ते सिद्ध करावे’, असे खुले आव्हान वायकरांनी सोमय्यांना दिले आहे. ‘नाहीतर किरीट सोमय्यांनी तोंड काळ करावे,. तसेच सोमय्यांवर अब्रू नुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचे देखील वायकर यांनी सांगितले.
हातात कागद घेऊन गिधाडासारखा फडफडतोय

संजय राऊतांकडून संताप
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कुटुंबावर केलेल्या गंभीर आरोपानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘खुलासा कोणी आणि कशासाठी करावा हे शेठजींच्या पक्षाचे व्यापारी असणारे प्रवक्ते सांगणार नाहीत. आमच्या मराठी भगिनीचे कुंकू पुसले गेले आहे. त्या स्वत: आणि त्यांची कन्या गेले अनेक महिने न्यायासाठी आक्रोश करत आहेत. त्याच्यावरती शेठजींच्या पक्षाचे हे व्यापारी प्रवक्ते बोलायला तयार नाही. कोण आहे हा माणूस? याला काय माहिती आहे. 2014 सालचा कायदेशीर व्यवहार. नुसता हातात कागद घेऊन गिधाडासारखा फडफडतोय’, अशा शब्दांत संजय राऊत यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. ‘आम्ही जेव्हा त्या अबलेला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत तेव्हा तपास भरकटवण्यासाठी आणि तपासाची दिशा बदलण्यासाठी हे शेठजींच्या पक्षाचे प्रवक्ते असे फालतू मुद्दे घेऊन समोर येत आहेत. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. म्हणजे त्या बाईचे कुंकू पुसले तरी चालेल. मराठी माणसाने केलेला व्यवहार यांच्या डोळ्यात खुपतोय का? म्हणे 21 व्यवहार केले. हा तर खोटारडेपणाचा कळस आहे. ही त्यांना वॉर्निंग आहे. त्यांनी अशी कितीही फडफड केली तरी महाराष्ट्राचे सरकार हे पाच वर्ष चालणारच आहे. आमची भूमिका अन्वय नाईक यांच्या पत्नीला न्याय देण्याची आहे. गुन्हेगारांना शिक्षा देण्याची आहे. शेठजीच्या पक्षाच्या प्रवक्त्यांना गुन्हेगारांना वाचवायचे आहे, म्हणून अशी फडफड करत आहेत. यातून काही निष्पन्न होणार नाही,’ असे संजय राऊत यांनी म्हटले.

अर्णब गोस्वामी कोण लागतो तुमचा?
‘ही निराशा, वैफल्य आहे. अर्णब गोस्वामी याला अटक करण्यात आली. त्यावेळी तुम्ही त्याला भेटण्यासाठी तुरुंगात जाता, आंकांडतांडव करत आहात. कोण लागतो तो तुमचा? आणि ती महिला तुमची कोणीही लागत नाही. तिचा नवरा आणि सासू मेली आहे. ते तुमचे कोणीही लागत नाहीत. हे महाराष्ट्राचे दुष्मन आहेत. हे ढोंगी, भंपक, खोटारडे, बनावट लोक आहेत’, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.