भाजप-शिवसेना युती आता संपल्यात जमा !

Pankaja Munde at Shivaji park
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे

गेल्या कित्येक वर्षांची भाजप बरोबरील शिवसेनेची युती या दोन पक्षातील नेत्यांच्या कडवटपणामुळे आता पूर्णांशी संपल्यात जमा आहे, असे भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा करण्यात आता अर्थ उरलेला नाही.

शिवसेना-भाजपची युती २०१४ मध्येही तुटली होती. त्यानंतर आता पुन्हा युती तुटून राज्यात सरकार स्थापन होऊनही एक वर्ष उलटले आहे. पण या वेळेला या दोन पक्षांमध्ये निर्माण झालेला कडवटपणा कमालीचा वाढला आहे. तो इतक्या टोकाला गेला आहे की तो जोडला जाणे अवघड आहे. हा वाद केवळ जखमा करण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. यामुळे आता युतीची चर्चा करण्यात काही अर्थ उरलेला नाही, असे मत पंकजा मुंडे म्हणाल्या.

पंकजा मुंडे मंगळवारी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईत आल्या होत्या. तेव्हा त्या बोलत होत्या. माझ्या मनात बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आदर असल्यामुळेच मी त्यांना अभिवादन करण्यासाठी आल्याचे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. शिवसेनेबरोबर युती असता दोन पक्षात सुरक्षिततेची भावना होती. आज जणू सगळेच असुरक्षित आहेत असे वाटू लागले आहे.

ठाकरे कुटुंबाचे संबंध जुनेच
बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल मनामध्ये आदराच्या भावना आहेत. स्मृतिस्थळ असल्यामुळे अभिवादन करण्यासाठी मी आले. बाळासाहेब पक्ष म्हणून एका विचाराचे राहू शकत नाहीत, ते सर्वांचे आहेत. बाळासाहेब आम्हा मुंडे कुटुंबासाठी आदरणीय आहेत. मुंडेसाहेब आणि बाळासाहेब यांचे घरगुती संबंध होते, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

शिवसेनाप्रमुखांना सर्वपक्षीय आदरांजली
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठव्या स्मृतीदिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळावर जाऊन आदरांजली अर्पण केली.त्यांच्यासह पत्नी रश्मी ठाकरे,पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे,पुत्र तेजस ठाकरे यांनीही आदरांजली वाहिली. दिवसभरात शिवसेनेचे मंत्री,आमदार,खासदार नगरसेवकांसह मोजक्याच शिवसैनिकांनी शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीला अभिवादन केले. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर आणि भाजप नेत्या पंकजा मुंडेसह अनेकांंनी आदरांजली वाहिली.