मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढेल युतीची गरज नाही

महापालिका विरोधी पक्षनेते रवि राजा यांचा दावा

सन २०२२ मध्ये होणारी मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवेल, यासाठी शिवसेनेशी युतीची गरज नाही, असे मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवि राजा यांनी म्हटले आहे. पण सध्या काँग्रेस आणि शिवसेना राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा भाग आहे.

यापूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस मुंबई महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच लढवेल, असे संकेत दिले होते. मात्र, पालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी आपल्याच प्रदेशाध्यक्षांच्या भूमिकेविरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यात होणार्‍या निवडणुका महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीनही पक्ष एकत्र येऊन लढवतात का? हे पहावे लागणार आहे.

स्थानिक राजकारणाबाबत बोलायचे झाल्यास मुंबई महापालिकेतील काँग्रेसमध्ये शिवसेनेबद्दल काहीशी नाराजी आहे. कारण, राज्यात महाविकास आघाडीप्रमाणे महापालिकेत शिवसेनेने ही आघाडी होऊ शकलेली नाही. स्थायीसह इतर समित्यांच्या निवडणुकीत काँग्रेसने शिवसेनेविरोधात लढत दिली होती. मात्र, यात काँग्रेसने माघार घेतल्याने शिवसेनेचे उमेदवार निवडून आले होते.

दरम्यान, नुकतेच मुंबई भाजपाच्या नव्या कार्यकारिणीच्या बैठकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेवर भाजपाचाच झेंडा फडकणार, असा विश्वास कार्यकर्त्यांना दिला होता. त्यामुळे भाजपाने २०२२ मध्ये होणार्‍या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी आत्तापासूनच स्वबळाची तयारी सुरु केल्याचे दिसले. मात्र, आता शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसे काय भूमिका घेतात हे पहावे लागणार आहे.