मराठा विरुद्ध ओबीसींना लढवण्याचे राज्य सरकारकडून कट-कारस्थान

devendra fadnavis
देवेंद्र फडणवीस यांची टीका

महाविकास आघाडी सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नाही. त्यामुळे राज्य सरकारकडून मराठा आणि ओबीसी समाजाला एकमेकांविरोधात उभे करण्याचे कारस्थान रचले जात आहे, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. भाजपचे सरकार असताना आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा केला.

हे करताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लावण्यात आला नव्हता. मात्र, आताच्या सरकारकडून मराठा आरक्षणासंदर्भात वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिले जात आहे. लोकांची समजूत काढता येत नाही म्हणून त्यांच्यात संभ्रम पसरवला जात आहे. यामधूनच मराठा समाजाला आरक्षण द्यायचे मग ओबीसींच्या कोट्यातून द्यायचे का, अशी नवी टूम काढण्यात आल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

गुरुवारी मुंबईत भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील राज्य सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली. तसेच मराठा आंदोलकांचा उद्रेक अगदी योग्य असल्याचेही सांगितले. आंदोलने ही चर्चेच्या माध्यमातून सुटतात. राज्यकर्त्यांना कायदा करण्याचे अधिकार विधिमंडळाने दिले आहेत. मात्र, महाविकासआघाडी सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.