नववर्षाचे स्वागत कोरोना लसीने होईल

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांची माहिती

नववर्षाचे स्वागत कोरोना लसीने होईल अशी आशा आहे. नववर्षाच्या सुरुवातीला आम्हाला एकापेक्षा अधिक कोरोना लसी मिळतील. आमचे तज्ज्ञ देशभरात कोरोना लस कशी पोहोचवावी याचे प्लॅनिंग करत आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली.

डॉ. हर्ष वर्धन यांनी केंद्रीय मंत्रीगटाला ही माहिती दिली. ते म्हणाले की, कोरोना लस तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नववर्षाच्या सुरुवातीला आम्हाला एकापेक्षा अधिक कोरोना लसी मिळतील, अशी अपेक्षा आहे. ही लस देशातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत कशी पोहोचेल, याचे प्लॅनिंग आमचे देशभरातील तज्ज्ञ मंडळी करत आहेत.

भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशासाठी लसीचा पुरवठा करण्याची प्राथमिकता अनेक बाबींवर अवलंबून आहे. यामध्ये त्या देशातील कोरोना संक्रमणाचा धोका, लोकांमध्ये अन्य रोगांचा प्रसार, कोरोनाचे मृत्यूदर आदी बाबी पाहिल्या जातील. आम्हाला शेवटच्या व्यक्तीपर्यंत कोरोना लस कशी पोहोचेल याची खबरदारी घ्यावी लागणार असल्याचे ते म्हणाले.

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 71,75,881 वर गेला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 55,342 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 706 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत एक लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, कोरोनातून बर्‍या होणार्‍या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. रिकव्हरी रेट वाढताना दिसत आहे. देशातील अनेक रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अनेकांनी उपचारानंतर कोरोनाची लढाई यशस्वीरित्या जिंकली आहे.