Coronavirus Update: बेशिस्त नागरिकांना आवरण्यासाठी पुण्यात लष्कर उतरणार

Pune
coronavirus indian army
प्रातिनिधिक छायाचित्र

केंद्र आणि राज्य सराकरकडून आवाहन करूनही नागरिक बेशिस्तपणे रस्तावर येत असल्याने आता पुण्यामध्ये लष्कर उतरवण्याची तयारी राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. तसे पत्र सरकारकडून लष्कराला पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुण्यामध्ये करोना रुग्ण वाढत असल्याने नागरिकांनी घरात राहावे यासाठी पोलीस प्रशासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र तरीही नागरिक रस्त्यावर उतरत असल्याने आता राज्य सरकारने पुण्यामध्ये लष्कराला पाचारण करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे पत्र राज्य सरकारकडून लष्कराला पाठवण्यात आले असून, लष्कराकडूनही त्याला सकारात्मकता दर्शविण्यात आली आहे.

सध्या पुण्यामध्येच लष्कराला पाचारण करण्यात येणार असून लवकरच राज्यातील अन्य भागातही लष्कराला पाचारण करण्यात येण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे “लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी अमेरिकेत लष्कराची मदत घेण्यात आली आहे. आपल्या राज्यात ती वेळ येऊ न देणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे”, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळीच केले होते.

पुणे शहरामध्ये आतापर्यंत १८ तर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रात १२ करोनाचे रुग्ण सापडले आहेत. त्यात पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करूनही पुणेकर घरात थांबात नाहीत, त्यामुळे आवाक्याबाहेर जात असलेली परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अखेर लष्कराला पाचारण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यातील खडकी येथील लष्कराच्या कॅम्पमधील सैन्य दल पोलिसांच्या मदतीला येणार आहेत. त्यामुळे पुण्यातील नागरिकांना बाहेर पडणे आता अधिक मुश्किल होणार आहे. पुण्याप्रमाणे अन्य शहरातील नागरिकांनीही घरातून बाहेर पडणे थांबवले नाही तर संपूर्ण राज्यात लष्कराला पाचारण करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here