अभिनेता मिथुन चक्रवर्तीच्या मुलासह पत्नीविरुद्ध गुन्हा

एका अभिनेत्रीवर लैंगिक अत्याचाराचा आरोप

महाक्षय चक्रवर्ती

सिनेअभिनेता मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाक्षय मिथुन चक्रवर्ती आणि पत्नी योगिता बाली या दोघांविरुद्ध गुरुवारी ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 38 वर्षांच्या एका अभिनेत्रीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार आणि तिचा गर्भपात करून धमकी दिल्याचा या दोघांवर आरोप आहे. लवकरच या दोघांची पोलिसांकडून चौकशी होईल आणि नंतर त्यांची जबानी नोंदविण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. 

पीडित अभिनेत्री ही अंधेरीतील ओशिवरा, यमुनानगर परिसरात राहते. तिने हिंदी, भोजपुरी, मल्यालम, तेलगू चित्रपटात काम केले आहे. मे 2015 रोजी तिची महाक्षय याच्याशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. त्यांच्यात चांगली मैत्री झाली. याच दरम्यान ती त्याच्या अंधेरीतील आदर्शनगर, लष्करिया हाईट्सच्या तिसर्‍या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 303 मध्ये गेली होती, तिथे त्याने शीतपेयातून गुंगीचे औषध दिले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. हा प्रकार नंतर तिच्या लक्षात येताच त्याने तिची माफी मागून तिच्याशी लग्न करणार असल्याचे सांगितले.

मे 2015 ते जून 2018 या कालावधीत त्यांच्यात अनेकदा शारीरिक संबंध आले. प्रत्येक वेळेस तो तिला लग्नाचे आश्वासन देत होता. याच संबंधातून ती गरोदर राहिली. यावेळी महाक्षय आणि त्याची सिनेअभिनेत्री आई योगिता बाली हिने तिला जबदस्तीने गर्भपात करण्यास प्रवृत्त करून तिला धमकी दिली होती. तीन वर्षे तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून महाक्षयने तिच्याशी लग्न केले नाही, तिची फसवणूक करून तिचा जबदस्तीने गर्भपात केला. त्यामुळे तिने त्याच्यासह योगिता बालीविरुद्ध दिल्लीच्या लोकल कोर्टात एक याचिका सादर केली होती.

या याचिकेवर सुनावणी देताना कोर्टाने पोलिसांना या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा तपास करण्याचे आदेश दिले होते. मात्र, हा गुन्हा मुंबईत घडल्याने दोन वर्षांनी ओशिवरा पोलिसांनी या अभिनेत्रीच्या जबानीवरून महाक्षय चक्रवर्ती आणि योगिता बाली यांच्याविरुद्ध 376 (2), (एन), 328, 313, 34 भादंवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यांचा तपास माधव भिसे करीत असून लवकरच महाक्षय आणि योगिता यांची पोलिसांकडून जबानी नोंदवून घेतली जाणार आहे.