Sunday, January 17, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी मुख्यमंत्र्यांनी एकही ठोस काम केलेले नाही

मुख्यमंत्र्यांनी एकही ठोस काम केलेले नाही

मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांचे टीकास्त्र

Related Story

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांच्या वर्षपूर्तीमध्ये एकही काम हे मुख्यमंत्र्यांनी ठोस असे संपूर्ण वर्षभरात केलेले नाही. कोरोनाच्या काळात महामारीवर नियंत्रण मिळवण्याचे काम तर उत्तराखंड आणि लडाखमध्येही झाले. पण संपूर्ण वर्षभरात एकही असे काम नाही जे या सरकारचे यश म्हणून आठवेल. म्हणूनच हे सरकार एक वर्षांच्या कामगिरीत सपशेल फेल झाले आहे, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली. ‘माय महानगर’च्या ‘खुल्लम खुल्ला’ या चर्चासत्रात ते महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने शुक्रवारी बोलत होते. याआधीच्या सरकारमध्येही ठाकरे होते. आता फक्त महाविकास आघाडीचे नेतृत्व ते करत आहेत. पण त्यांच्या नेतृत्वात कोणताही वेगळापणा दिसला नाही.

आगामी ठाणे महापालिका निवडणुका डोळ्यासमोर लक्षात ठेवून मनसेही तयारी करत आहे. आगामी कालावधीत ठाणेकरांना पर्यटनासाठी येऊरच जंगल, पाणी पुरवठा करणारे स्वतःचे असे धरण, रस्त्यावर अपघात होऊन मृत्यू होणार नाही अशी रस्त्यांची व्यवस्था तसेच राहण्यासाठी चांगल्या इमारती देण्याचा आमचा प्रयत्न असेल. याआधीही आम्ही २०१७ मध्ये डिजिटल अजेंडा जाहीर केला होता. पण येत्या ठाणे महापालिका निवडणुकांमध्ये जो येईल तो मनसेचाच येईल असा विश्वास अविनाश जाधव यांनी व्यक्त केला. ठाण्यात आजही किसन नगरमध्ये जुन्या इमारतीत लोक जीव मुठीत घेऊन झोपतात. तर रस्त्यात बाईक रायडर्सचे अपघात होऊन मृत्यू होतात.

- Advertisement -

ठाण्याची तीन हजार कोटींची मुंबई महानगरपालिका आहे, पण तरीही ठाण्यातले खड्डे हे महापालिकेला बुझवता येत नाहीत ही खंत आहे. ठाणे महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे, शिवसेनेचे पालकमंत्री आहेत, आमदार शिवसेनेचे, मतदारसंघ शिवसेनेचे पण तरीही ठाणेकरांचा रस्त्याचा विषय सुटत नाही अशी टीका त्यांनी केली. ठाणे म्हणजे तलावांचे शहर म्हणून ओळख, पण ती ओळखदेखील आपल्याला टिकवता आलेली नाही. ठाण्याला इतक्या वर्षांनंतरही स्वतःचे पाण्यासाठीचे धरण नाही, आजही भाडेतत्वावर पाणी घेऊन पाणी घेण्याची स्थिती ठाणेकरांवर आहे. त्यामुळे मनसेचे ठाण्यातले काम पाहूनच आगामी निवडणुकांमध्ये कल हा मनसेलाच असेल. यापुढे ठाण्यात राजसाहेबांना कोणी फसवणार नाही असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पोलिसांवर प्रचंड दबाव

- Advertisement -

मराठी नंबर प्लेटवर कारवाई होते, हे अत्यंत दुर्दैवी आहे. सरकारचे डोक फिरले आहे. पोलिसांवर अशा प्रकारच्या कारवाया करण्यासाठी दबाव आहे. हा दबाव वरून आलेला असा आहे. पोलीसही कोणीतरी सांगतो म्हणून काम करतात. ठाण्यात मनसेच्या मोर्चांना प्रतिसाद मिळतो आणि प्रचंड विरोधही होतो. हेदेखील पोलिसांना कोणीतरी सांगतं म्हणून काम करतात. लोकांमध्ये प्रक्षोभ आहे, पण लोक बोलत नाहीत. अविनाश जाधव बोलतो तेव्हा लोकांच्या प्रश्नांना पावती मिळते. लोकांना काय त्रास होतो त्याला थेट विरोध होत नाही, पण लोकांचे बारीक लक्ष असे. म्हणून लोक या सगळ्याकडे चिडीने पाहत असतात.

कृष्णकुंज प्रतिमंत्रालय

लोकांना का वाटते मनसेकडे गेल्यावर काम होते. मनसेच्या पक्ष कार्यालयात गेल्याने आपले काम होत असल्याचे समाधान मिळते. महाविकास आघाडीने वर्षभरात काहीच काम केले नाही. फक्त कोविडमध्ये उत्तमरीत्या भ्रष्टाचार करण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले. म्हणूनच लोकांना कृष्णकुंजवर गेल्या न्याय मिळतो, असा विश्वास वाटतो. म्हणूनच कृष्णकुंज हे प्रतिमंत्रालय झाले आहे. जो विश्वास राज ठाकरे यांच्या बाबतीत आहे, तसा विश्वास मातोश्रीवर नाही. म्हणूनच मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत ही भावना नाही. मातोश्रीवर काम होत नाही, म्हणून मातोश्रीवर गर्दी दिसत नाही. मातोश्रीचे दरवाजेही सर्व सामान्यांसाठी खुले नसतात. न्याय कृष्णकुंजवर मिळतो म्हणूनच ते आता प्रतिमंत्रालय झाले आहे.

वीज बिलावर सरकारची डोळेझाक

कोरोना काळात विजेचे बिल फुगवून दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांना पत्र दिले, ऊर्जा मंत्र्यांना भेटलो, राज्यपालांनाही भेटलो. पण रस्त्यावर उतरण्याची वेळ आली. लाईट बिल आले असेल तर रस्त्यावर उतरणे चुकीचे कुठे ? मोगलाई आली आहे का, असाही सवाल त्यांनी केला. लाईट बिलामुळे लोक त्रस्त आहेत. राज्य सरकारची मानसिकता नाही म्हणूनच वीज बिलात सवलत मिळत नाही. वीज बिल सवलत देऊन त्यामधून काहीच टक्केवारी, फायदा मिळणार नाही. जलसंपदा, धरणे, बांधकाम विभागाशी संबंधित निधी द्यायचा असता तर काहीतरी फायदा करून, सेटलमेंट किंवा टक्केवारीच्या माध्यमातून तो फायदा काढता आला असता. पण दिसूनही डोळेझाक करायची हे सरकारचे धोरण आहे. म्हणूनच वीज बिलांसाठी सवलत देण्यासाठी सरकार सगळी राज्यातील परिस्थिती दिसूनही डोळेझाक करत आहे. वीज बिलांच्या बाबतीत संपूर्ण राज्यात हीच अवस्था आहे. वाढलेले वीज बिल हे कोविड वॉरियरचे दुखणे आहे. तसेच महाराष्ट्रातील प्रत्येकाचे, शिवसैनिकाचे दुखणे आहे, पण शिवसैनिकाला ते बोलता येत नाही, कारण शिवसेना सत्तेत आहे.

कोविडच्या काळात सर्वात मोठा भ्रष्टाचार

कोरोनाच्या काळात मिरा भाईंदरमध्ये टेंभा नावाच्या हॉस्पिटलला ५ कोटी रूपये देऊन त्याला बळकटी देता आली असती. पण १४ कोटी रूपये भरून तात्पुरते कोविड सेंटर निर्माण करण्यात आले. सर्व गोष्टी भाडेतत्वावर घेतल्याने ऑडिटला बगल देण्यासाठी हा प्रकार झाला. अन्यथा मिरा भाईंदरवासीयांना एक चांगले हॉस्पिटल मिळाले असते. राज्यावरचे संकटच इतके मोठे होते की त्यावेळी आम्ही बोललो नाही, राजकारण केले नाही. मुंबई महापालिकेच्या महापौराच्या मुलाला टेंडर दिल्याचा प्रकारही याच काळात उघडकीस आला. सात दिवसांपूर्वी नोंदणी झालेल्या कंपनीला कोट्यवधीचे काम देण्यात आले. हे पाप कोणाचे आहे ? हे शोधायला हवे.

रक्तात राज ठाकरे

ठाण्यातल्या विविध कामांसाठी राज ठाकरे हेच प्रेरणास्थान आहे. आमचे गॉडफादर राज ठाकरे आहेत आणि रक्तातही राज ठाकरे आहेत. मी राजसाहेबांचा कडवट सैनिक आहे, यापुढे कुणाच्या हाताला लागणार नाही आणि मनसेतच राहणार अशी ग्वाही अविनाश जाधव यांनी दिली. शिवसेनेचे नेतेही राजसाहेबांना भेटायला येतात. म्हणून जोवर राजसाहेबांसोबत आहे तोवर मराठी माणसांची कामे करायला आमच्याकडे वेळ आहे. शिवसेनेच्या हातात काय, आजूबाजूलाही लागणार नाही असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला. म्हणूनच किमान माझ्यासाठी तरी शिवसेनेने प्रयत्न करू नये, असेही त्यांनी बजावले.

- Advertisement -