घरठाणेठाण्यातील कोविड रुग्णालयात बोगस डॉक्टरांमुळे अनेक रुग्णांचा जीव गेल्याची भीती

ठाण्यातील कोविड रुग्णालयात बोगस डॉक्टरांमुळे अनेक रुग्णांचा जीव गेल्याची भीती

Subscribe

आमदार निरंजन डावखरे यांची कारवाईची मागणी

महापालिकेच्या कोविड रुग्णालयातील तिघा बोगस डॉक्टरांमुळे अनेक रुग्णांचा जीव गेला असावा, अशी भीती भाजपाचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणात संबंधित डॉक्टरांच्या कागदपत्रांची छाननी न करताच नियुक्ती करण्यासाठी मान्यता देणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही आमदार डावखरे यांनी केली आहे.

बाळकूम येथील कोविड रुग्णालयात इंटर्नशिप पूर्ण न केलेले दोन आणि एक विद्यार्थी अशा तिघा डॉक्टरांची एमबीबीएस डॉक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यातील दोघे डॉक्टर आयसीयू कक्षातील रुग्णांवर उपचार करीत असल्याचे वृत्त आहे. या कारभारामुळे महापालिकेचा बेजबाबदार कारभार उघड झाला आहे. शहरातील खासगी रुग्णालये लाखो रुपये वसूल करीत असल्यामुळे शेकडो गरीब आणि सामान्य रुग्ण महापालिकेच्या कोविड रुग्णालयात दाखल होतात. मात्र, महापालिकेच्या बेफिकीर कारभारामुळे तेथे बोगस डॉक्टरांची नियुक्ती केली जाते. या डॉक्टरांमुळे निश्चितच काही रुग्णांना जीव गमवावा लागला असेल, अशी शक्यता आमदार डावखरे यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

तसेच या प्रकरणात संबंधित डॉक्टरांच्या नियुक्ती प्रक्रियेतील सहभागी अधिकारी आणि कंत्राटदार कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. बोगस डॉक्टरांनी नियुक्तीच्या काळात कोणकोणत्या रुग्णांवर उपचार केले होते, या रुग्णांची प्रकृती सध्या कशी आहे, या काळात किती रुग्णांचा मृत्यू झाला, याची चौकशी करावी, अशी मागणीही आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे.
बेफिकिरी जुनीच

ठाणे महापालिकेकडून डॉक्टरांच्या नियुक्तीत दाखविण्यात येणारी बेफिकिरी जुनीच आहे. यापूर्वीही मुंबईतील नामांकित रुग्णालयातून गुन्हा दाखल झालेल्या बोगस डॉक्टरची छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नियुक्ती करण्यात आली होती. संबंधित प्रकरण उघड झाल्यानंतरही, कोणावरही कारवाई झाली नव्हती. तीच परंपरा आता कोविड रुग्णालयात सुरू आहे, अशी टीका आमदार डावखरे यांनी केली.

- Advertisement -

रुग्णालयाचे श्रेय घेणारे सत्ताधारी बोगस डॉक्टर प्रकरणाची जबाबदारी घेणार का? – निरंजन डावखरे

बाळकूम येथील कोविड रुग्णालयाचे श्रेय घेणारे सत्ताधारी शिवसेनेचे नेते आता बोगस डॉक्टरांच्या नियुक्तीची जबाबदारी घेणार का, असा टोला आमदार निरंजन डावखरे यांनी लगावला आहे. यापूर्वी या ठिकाणी रुग्ण बेपत्ता, मृतदेहांची अदलाबदल, महिला रुग्णाच्या विनयभंगाचा प्रयत्न आदी गंभीर प्रकार घडले होते. आता बोगस डॉक्टरांमुळे गरीब रुग्णांच्या जीवाशी सत्ताधाऱ्यांकडून खेळ सुरू असल्याचे उघड झाले आहे, असा आरोपही निरंजन डावखरे यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -