कोरेगाव-भीमाप्रकरणी आठ जणांविरुद्ध १० हजार पानांचे आरोपपत्र दाखल

bhima koregaon
कोरेगाव भीमा प्रकरण

कोरेगाव-भीमा प्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आठ जणांविरुद्ध १० हजार पानांचे आरोपपत्र विशेष एनआयए कोर्टात शुक्रवारी दाखल केले आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने आनंद तेलतुंबडे, गौतम नवलखा, हनी बाबू, सागर गोरखे, रमेश गायचोर, ज्योती जगताप, स्टेन स्वामी आणि मिलिंद तेलतुंबडे यांच्यासह आठ जणांविरूद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. भीमा-कोरेगावमध्ये 2018 मध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणात एनआयएने मोठी कारवाई केली होती. 83 वर्षीय फादर स्टेन स्वामी यालाही एनआयएने झारखंडमधून अटक केली आहे.

कोरेगाव-भीमा प्रकरणाची चौकशी करणार्‍या एनआयएच्या टीमने गुरुवारी रात्री फादर स्टेन स्वामी याला नामकुम स्टेशन हद्दीत येणार्‍या बगईंचा स्थित त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेतले. जवळपास 20 मिनिटे चौकशी केल्यानंतर स्वामी यांना अटक करण्यात आली.

कोरेगाव-भीमा प्रकरणात आतापर्यंत नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अनेकांना अटक करण्यात आली आहे. 1 जानेवारी 2018 मध्ये पुण्याच्या कोरेगाव-भीमा येथे एका कार्यक्रमादरम्यान हिंसाचार उफाळला होता. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. काही दिवसांपूर्वी एल्गार परिषद व कोरेगाव-भीमा प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला संशयित आरोपी वरवरा राव यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. वरवरा राव यांचा विशेष एनआयए न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांनी या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या संशयावरून वरवरा राव (81) यांनी जामिनावर सुटकेसाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, 26 जून रोजी विशेष न्यायालयाने अर्ज फेटाळला. राव यांचा वैद्यकीय अहवाल आणि त्यानुसार कारागृह प्रशासनाने केलेले उपचार याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश तळोजा कारागृहाला द्यावेत. तसेच राव यांची तत्काळ वैद्यकीय तपासणी करावी आणि आवश्यकता भासल्यास त्यांना खासगी रुग्णालयात भरती करण्यात यावे, अशी विनंती याचिकेद्वारे करण्यात आली आहे.