घरताज्या घडामोडीएकनाथ खडसेंनी मागितली ब्राह्मण समाजाची माफी

एकनाथ खडसेंनी मागितली ब्राह्मण समाजाची माफी

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंच्या वादग्रस्त विधानावरून ब्राह्मण समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना एकनाथ खडसेंनी मी मुख्यमंत्रिपद ब्राह्मणाला दान केले असे विधान केले होते, त्यावरून पुण्यातील ब्राह्मण महासंघाने खडसेंच्या विधानावर आक्षेप घेत त्यांनी तातडीने माफी मागावी असे म्हटले आहे. आता, एकनाथ खडसेंनी ट्विट करून माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे म्हटले आहे. तसेच, दिलगिरीही व्यक्त केली आहे.

ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले की, एकनाथ खडसेंनी फडणवीसांवर टीका करताना ब्राह्मण समाजाबाबत जे वक्तव्य केले ते त्यांनी मागे घ्यावे, अन्यथा पुण्यात खडसेंचा एकही कार्यक्रम होऊ देणार नाही, त्यांच्या वक्तव्याचे परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे पदवीधर निवडणुकीत भोगावे लागतील, असेही दवेंनी सांगितले आहे. त्याचसोबतच दान देण्यासाठी मुळात ती वस्तू आपल्या अधिकारात असायला हवी, हे एकनाथ खडसेंना ज्ञात नाही याचे आश्चर्य वाटते. एकनाथ खडसेंनी आपले विधान मागे घ्यावे नाहीतर पुण्यात आल्यानंतर खडसेंना जाब विचारण्यात येईल. यासंदर्भात आनंद दवेंनी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना निवेदनही दिले आहे. ब्राह्मण महासंघाच्या इशार्‍यानंतर एकनाथ खडसेंनी ट्विट करून दिलगिरी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

६ नोव्हेंबर २०२० रोजी मी सभेमध्ये जे बोललो, त्याचा विपर्यास केला गेला. ब्राह्मण समाजासह अन्य सर्वच समाजांचा मी माझ्या राजकीय आयुष्यात नेहमीच आदर केला आहे. झालेल्या विपर्यासामुळे ब्राह्मण समाजातील बांधवांच्या भावनांना जर ठेच पोहचली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो,असे खडसेंनी म्हटले आहे.

नाथाभाऊ तुम्ही आता घरी बसा मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, असे मला सांगितले गेले. त्यावर मी म्हटले की, मी भल्याभल्यांना दान देतो. मग एका ब्राह्मणाला दान द्यायला काय हरकत आहे. तेव्हा मी मुख्यमंत्रिपद ब्राह्मणाला दान केले, एका व्यक्तीच्या लाडापोटी माझ्यासारख्यांना बाजूला टाकण्यात आले. त्याच व्यक्तीमुळे सरकारचे वाटोळे झाले अशा लोकांमुळेच मला भाजपा सोडावा लागला, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -