घरताज्या घडामोडीकाही झाले तरी ड्युटी करायची हे मनाशी पक्के ठरवले होते - साक्षी...

काही झाले तरी ड्युटी करायची हे मनाशी पक्के ठरवले होते – साक्षी बेर्डे, महिला पोस्टमन

Subscribe

मालाडच्या पोस्ट ऑफिसमध्ये काम करणार्‍या महिला पोस्टमन साक्षी बेर्डे. गेली दहा वर्षे त्या या क्षेत्रात कार्यरत आहेत. काही झाले तरी कोरोनाच्या काळात ड्युटी करायचीच हे त्यांनी मनाशी पक्के ठरवले होते. कोरोनाचा जास्त प्रभाव असताना त्यांनी लोकांना अत्यावश्यक सेवा दिली आणि आजही देत आहेत.

क्षेत्र कोणतेही असो तिथे स्त्रीया आल्या की लगेचच लोकांच्या भुवया उंचावतात. माझ्या बाबतीतही असे झाले. गेल्या दहा वर्षांपासून मालाड ईस्ट पोस्ट ऑफिसमध्ये पोस्टमन म्हणून काम करतेय. घरी नवरा, दोन मुले आणि सासू. घाटकोपर ते मालाड असा प्रवास गेल्या दहा वर्षांपासून करतेय. सुरुवातीला सगळेच नवीन वाटायचे. ती जड बॅग घेऊन लोकांच्या घरोघरी जाणे त्यांना पत्र देणे. आपण करत असलेल्या कामाचा कधी हेवा वाटला नाही. पण कोरोनाच्या काळात काम करताना भारतीय असण्याचा तसेच इंडिया पोस्टमन डिपार्टमेंटचा भाग असल्याचा अभिमान वाटतो.

कोरोनाचा काळ आला आणि मनात धाकधूक व्हायला सुरुवात झाली. या काळात घरदार सोडून बाहेर पडायचे. आपल्यामुळे घरच्यांना काही झाले तर ही काळजी होतीच. सुरुवातीचे दिवस भीतीदायकच होते. पोस्ट डिपार्टमेंटचा पूर्णपणे पाठिंबा होता. तरीही मनात भीती होतीच. आपल्यावरच नाही तर सार्‍या देशावर आणि जगावर ही परिस्थिती ओढावलेली आहे हे सतत मनाला सांगत होते.

- Advertisement -

एखादी स्री जेव्हा घराबाहेर पडते तेव्हा लोकांचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. आपण ज्या देशात राहतो त्या देशाचे काही तरी देणे लागतो. देशासाठी काही तरी करण्याची ही संधी माझ्यासाठी आली होती. कंबर कसली आणि कामावर जायचे असे ठरवले.

मालाड पोस्ट ऑफिसमध्ये गेली दहा वर्षे काम करतेय. पोस्टाशी निगडित कामे करणे हेच आजवर करत आले होते. पण आताची परिस्थिती वेगळी होती. केवळ पोस्टाचीच नाही तर आता डॉक्टर, पेशंट, क्वारंटाईन सेंटरमधले लोक आणि त्याच्या व्यतिरिक्त अनेक लोकांना ही सेवा द्यायची होती. कोरोनाच्या काळात लोकांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना सेवा देणे ही गोष्ट खरंच खूप कठीण होती. लोक काय म्हणतील? आपल्याला दारात उभे करतील की नाही? ही पहिली भीती मनात असायची. पण कोरोनासारख्या काळात आपली महत्त्वाची वस्तू मिळाल्यानंतर लोकांच्या चेहर्‍यावरील आनंद बघण्यासारखा होता. त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहून मनात असलेली भीती निघून जायची. आपण करत असलेल्या कामाचे समाधान वाटायचे. लोक आपुलकीने चौकशी करायचे. कोरोना काळात आम्ही लोकांना अत्यावश्यक सेवा पुरवल्या याचा स्वत:ला अभिमान वाटू लागला.

- Advertisement -

घर सांभाळून एक स्री या काळात ड्युटी पार पाडते, याबद्दल लोकांना अभिमान वाटायचा. या काळात बाहेरच्या जगात आपली काळजी करणारी अनोळखी माणसे भेटली. प्रत्येक जण काळजी करायचा. ‘बेटा अपनी केअर करो. इस समय में बाहर घुम रहे हो’, ही वाक्ये ऐकल्यानंतर पुढचे काम करण्यासाठी एक वेगळी ऊर्जा मिळायची. गरजेच्या वस्तू लोकांपर्यंत पोहचल्यावर लोक सॅलूट ठोकायचे. त्यांचे हे सॅलूट आयुष्यात खूप काही देऊन जायचे. इंडिया पोस्टमन डिपार्टमेंटचा भाग असण्याचा आणि एक भारतीय असल्याचा त्या क्षणी अभिमान वाटायचा.

एका स्रीसाठी घर सांभाळून काम करणे ही खरंच तारेवरची कसरत असते. ‘तु जा, तुझे काम कर, घरचे टेन्शन घेऊ नकोस’, असे जेव्हा सासूबाईंनी म्हटले त्याच वेळी माझ्यावरची अर्धी जबाबदारी पार पडली होती. घरातली स्री जेव्हा घराबाहेर पडते तेव्हा लोकांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. पण या काळात मी घराबाहेर पडले ते केवळ माझ्या घरच्यांच्या प्रोत्साहनामुळे. नवरा, सासूबाई आणि दोन मुलांनी वेळोवेळी मला काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले. काम करून घरी गेल्यानंतर घरच्यांच्या मनात माझ्याविषयी आदर असायचा. त्यांच्या डोळ्यात अभिमान दिसायचा.

या काळात स्वत:ची काळजी घेणे हे महत्त्वाचे होते. पण मला कधी माझी काळजी घ्यावी लागली नाही. ऑफिसचे आमची घरच्यांप्रमाणे काळजी घेत होते. ऑफिसमधून आमची वेळोवेळी योग्य ती काळजी घेतली जात होती. ऑफिसमधील अधिकारी आणि घरच्यांशिवाय या काळात बाहेर पडून काम करणे कदापि शक्य नव्हते.

शब्दांकन –मिनल गुरव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -