कोरोनामुक्त रुग्णांसाठी राज्यातील पहिले पोस्ट कोविड सेंटर ठाण्यात

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार उद्घाटन

कोरोनामुक्त झाल्यानंतरही उद्भवणार्‍या विविध समस्यांवर कशी मात करायची तसेच कोरोनामुक्त झाल्यानंतरही आपण काय काळजी घ्यायला हवी, यासाठी ठाणे महानगरपालिकेने राज्यातील पहिले अद्ययावत पोस्ट कोविड सेंटर उभारले आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत या सेंटरचे उद्घाटन होणार आहे. या पोस्ट कोविड सेंटरमध्ये ये-जा करण्यासाठी ठाणे स्टेशन येथून विशेष बसची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी ६.३० पासून रात्री १२ पर्यंत दर अर्ध्या तासाने या सेंटरसाठी बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कोरोनामुक्त रुग्णांसाठी राज्यातील पहिले अद्ययावत पोस्ट कोविड सेंटर ठाणे महापालिकेच्यावतीने उभारण्यात आले आहे. लोढा लक्झोरिया कॉम्प्लेक्स, माजिवडा येथील महापालिकेच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर हे अद्ययावत पोस्ट कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. या ठिकाणी कोरोनामुक्त झाल्यानंतरही रुग्णांना जाणवणार्‍या अनेक लक्षणांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, कोरोनामुक्त रुग्णांचे मनोबल वाढविण्यासाठी तसेच कोरोनाच्या काळातील कटू अनुभवातून बाहेर काढण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञ, आहारतज्ज्ञ, योगतज्ज्ञ, समुपदेशक, फिजिओथेरपिस्ट यांच्यासह या सेंटरमध्ये योगा सेंटर, विश्रांती कक्ष तसेच समुपदेशन सेंटर अशा सर्व अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.