हाथरस प्रकरणावरून विरोधकांचे कट कारस्थान -योगी आदित्यनाथ

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

हाथरसप्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. विरोधक हाथरस प्रकरणावरून राजकारण करत आहेत. कट-कारस्थान केले जात आहेत. कट-कारस्थानासाठी परदेशातून फंडिंग करण्यात आली. मात्र, हे कट-कारस्थान कोणत्याही स्थितीत यशस्वी होऊ दिले जाणार नाही, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

योगी म्हणाले, सरकार विकासाच्या कामात गुंतले आहे. तर हे लोक कट-कारस्थान करण्यात व्यस्त आहेत. कोरोनाविरोधातील लढाईत यापैकी एकही चेहरा जनतेत दिसला नाही.विरोधक राज्यात दंगलीची स्वप्न बघत आहेत.

यावर बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले, जनतेच्या विश्वासाशी खेळ खेळण्याची मुभा कुणालाही दिली जाणार नाही. समाजात द्वेष भावना निर्माण करून विकासात अडचणी निर्माण करण्याची काही लोकांची इच्छा आहे. विकासाच्या बाबतीत उत्तर प्रदेश वेगाने पुढे जात आहे. स्वातंत्र्यानंतर उत्तर प्रदेशात केवळ दोनच एक्स्प्रेस वे होते. आमचे सरकार आल्यापासून तीन वर्षात तीन नवे एक्स्प्रेस वे तयार होत आहेत. 2014 पर्यंत उत्तर प्रदेशात केवळ दोनच विमानतळे कार्यरत होती.

आता 7 विमानतळे कार्यरत आहेत. तर 12 नव्या एअरपोर्टवरील काम सुरू झाले आहे. समाजोपयोगी योजना चांगल्या वाटत नाहीत, या लोकांना हितकारक, समाजोपयोगी योजना चांगल्या वाटत नाहीत. विकासाच्या मुद्यांवर सरकारविरोधात प्रश्न उपस्थित करू शकत नाहीत, म्हणून आता, अशा प्रकारचे कट-कारस्थान आखत आहेत. मात्र, आता या नमुन्यांची पोलखोल होत आहे. यांचे कारस्थान जनतेसमोर येत आहे.

जातीय दंगली घडवण्यासाठी मॉरिशसमधून फंडिंग
हाथरस प्रकरणासंदर्भात, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठा दावा केला आहे. उत्तर प्रदेशात जातीय दंगली घडवून आणण्यासाठी फंडिंग करण्यात आले आहे. ही फंडिंग मॉरिशसमधून झाली असून दंगली घडवण्यासाठी देशात १०० कोटी रुपये पाठवण्यात आल्याचा दावा ईडीने केला आहे.