घरठाणेVideo: हाथरस सारखी घटना माझ्या महाराष्ट्रात घडता कामा नये, उद्धव ठाकरेंची सक्त...

Video: हाथरस सारखी घटना माझ्या महाराष्ट्रात घडता कामा नये, उद्धव ठाकरेंची सक्त ताकिद

Subscribe

उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने अवघ्या देशातील वातावरण ढवळून निघालेले असताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यावर एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे.
“पोलिसांचा असतो तो दरारा आणि गुंडाची असते ती दहशत. उत्तर प्रदेशमध्ये जे घडले ते सहन होणारे नाही. महाराष्ट्रात अशी कोणतीही घटना घडता कामा नये, अशा प्रकारचा कारभार मला पोलिसांकडून हवा आहे. त्यामुळे पोलिसांनी आपला दरारा कायम ठेवावा.”, अशी भूमिका ठाकरे यांनी मांडली आहे. आज मुख्यमंत्र्यांच्याहस्ते मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे ई उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते.

- Advertisement -

“सर्वसामान्य निर्दोष जनतेला पोलिसांची आदरयुक्त भीती आणि गुन्हेगारांना दहशत असे वातावरण पोलिसांनी तयार करून जनतेला दिलासा मिळवून द्यावा. तसेच पोलिसांचा वचक निर्माण करा. सागरी सुरक्षेबरोबरच कायदा- सुव्यवस्था अबाधित राखून आदर्श , सुरक्षित आणि गतिमान अशी मीरा- भाईंदर, वसई -विरार पोलीस आयुक्तालयाची ओळख निर्माण करावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

जनतेचे रक्षण हे पोलिसांचे प्रथम कर्तव्य आहे. गुंडागर्दीला आळा घालण्याबरोबरच महिलांसाठी सुरक्षित वातावरण तयार करा. आपल्या कर्तव्य कठोर कामगिरीने आदर्श आयुक्तालय म्हणून नावलौकिक मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत. सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे राहील, अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली.

- Advertisement -

शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेच्यादृष्टीने पोलीस आयुक्तालय ही अत्यावश्यक बाब होती. या शहरांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढते आहे. येथील स्थानिक जनतेच्या मनात पोलिसांविषयी मित्रत्वाची भावना निर्माण करताना पोलिसांबद्दलचा आदर निर्माण करा. वाईट कृत्य करताना पोलिसांचे आपल्यावर लक्ष ठेऊन आहेत ही भीती प्रत्येकाला वाटली पाहिजे. जनतेचे रक्षण हे पोलिसांचे प्रथम कर्तव्य आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

या ऑनलाईन सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, पालघरचे पालकमंत्री दादाजी भुसे, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, शंभुराजे देसाई, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायसवाल, मीरा भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्त सदानंद दाते यांसह ठाणे पालघर जिल्ह्यातील खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -