आधीच कोरोना त्यात सर्वसामान्यांचे महागाईने मोडले कंबरडे

कोरोनाच्या दहशतीत असलेल्या सर्वसामान्यांची आता महागाईने कंबर मोडली आहे. धान्य, कडधान्य, डाळींपासून अंडी, चिकन यांच्या भावात मोठी वाढ झाली आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकर्‍या गेल्या असताना आता महागाई सर्वसामान्यांना जगू देते की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. फ्लॉवर १८ रुपयांवरून थेट ३६ रुपये किलो झाला आहे, तर हिरवा वाटणा १०० रुपयांवरून १६० रुपयांवर पोहचला आहे. कांदा ४४ ते ५० रुपयांपर्यंत गेला आहे. भाज्यांची ही परिस्थिती असताना अंडी ६० रुपयांवरून थेट ७२ रुपये डझनवर पोहचली आहेत. तर बॉयलर चिकन १३५ रुपये किलोवरून १६५ रुपये किलो झाले आहे. तूरडाळ ९० रुपयांवरून १२० रुपयांवर गेली आहे. वाढत्या महागाईमुळे पोट कसे भरायचे, असा प्रश्न सध्या सर्वसामान्यांना कोरोनापेक्षा जास्त सतावत आहे.

राज्याच्या विविध भागात काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने त्याचा विपरीत परिणाम भाज्यांच्या पिकांवर झाला आहे. शेतात पाणी साचल्याने अनेक ठिकाणी पिके खराब झाल्याने भाज्यांची आवक घटल्याने त्याचा विपरीत परिणाम भाज्यांच्या दरांवर झाला. भाज्यांच्या दरात होत असलेल्या चढउतारामुळे ग्राहक मात्र हैराण झाले आहेत. पावसाचा फटका मोठ्या प्रमाणात बसल्याने भाज्यांच्या दरांमध्ये वाढ होत चालली आहे, अशी प्रतिक्रिया एपीएमसीतील भाजी मार्केटचे संचालक शंकर पिंगळे यांनी आपलं महानगरशी बोलताना व्यक्त केली आहे.

वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये फ्लॉवरने १८ रुपयांवरून थेट ३६ रुपये किलोचा दर गाठला आहे. त्यामुळे फ्लॉवर खावा की नाही , असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. गेल्या महिनाभरापासून १८ ते २० रुपये किलोच्या दरम्यान असलेली कोबी मात्र ग्राहकांच्या खरेदीच्या आवाक्यात आहे.

कोरोनाचे लॉकडाऊन संपून मिशन बिगिन अगेन सुरू झाल्यानंतर एपीएमसीच्या भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांची आवक वाढली आहे. आवक बरोबर ग्राहकांची संख्याही वाढल्यामुळे भाज्यांचे दर तेजीत आले आहेत. महिनाभरापासून मार्केटमध्ये भाज्यांच्या दरांचा चढउताराचा खेळ सूरू आहे. पंधरवड्यापूर्वी ठोक मार्केटमध्ये टोमॅटो ५० रुपये किलो विकला जात होता, आता त्याचा दर थेट ३५ रुपयांवर आला आहे. वांगी दोन आठवड्यांपूर्वी २० रुपये किलो या दराने मिळत होती. आता त्यांच्यासाठी ३० रुपये मोजावे लागत आहेत. वाटाण्याने मात्र १२० रुपयांवरून १६० रुपयांवर उडी मारली आहे.

वस्तू (एपीएमसी) (किरकोळ)

कांदा २८ ते ४० ५० ते ६०
वाटाणा १०० ते १४० १६० ते १८०
फरसबी ६० ते ७० ८० ते १००
फ्लॉवर २५ ते ३५ ८०ते १००
शेवगा शेंग ५० ते ६० ८० ते १००
बीट २८ ते ३६ ५० ते ६०
आले ४५ ते ६० ६० ते ८०
चनाडाळ ५८ ते ६५ ७० ते ७५
मसूरडाळ ६३ ते ६८ ८० ते ९०
उडीदडाळ ७५ ते ९५ ९० ते १००
तूरडाळ ८५ ते ९५ ९० ते १२०
मूगडाळ ९५ ते १०५ १०० ते १२०