घरताज्या घडामोडीटाटा ग्रुपकडून कोरोना टेस्ट किट लाँच

टाटा ग्रुपकडून कोरोना टेस्ट किट लाँच

Subscribe

चिनी किटपेक्षा जास्त परिणामकारक

कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये हजारो कोटी रुपयांची मदत करणार्‍या टाटा ग्रुपने आता मोठा दिलासा दिला आहे. टाटा मेडिकल अँड डायग्नोस्टिकने कोरोना चाचणी करण्यासाठी नवीन टेस्ट किट लाँच केले आहे. यामुळे परदेशी टेस्ट किटवरील खर्चही वाचणार असून मोठ्या प्रमाणावर चाचण्या करण्यास मदत मिळणार आहे. महत्वाचे म्हणजे टाटाने लाँच केलेले हे टेस्ट किट चिनी टेस्ट किटपेक्षा जास्त परिणामकारक आणि सोपे असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. टाटाच्या टेस्ट किटचे नाव टाटा एमडी चेक असे ठेवण्यात आले आहे.

टाटाने तयार केलेले हे कोविड-19 टेस्ट किट्स डिसेंबर महिन्यात देशभरातील लॅबमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहेत. सीईओ गिरिश कृष्णमूर्ति यांनी ही माहिती दिली आहे. आयसीएमआर आणि डीसीजीआयने या चाचणी किटला परवानगी दिली आहे. दर महिन्याला 10 लाख किट चेन्नईतील टाटा फॅक्टरीमध्ये बनविण्यात येणार आहेत. टाटा एमडी चेक हे टेस्ट किट फास्ट रिझल्ट देणारे आहे. इमेज बेसड रिझल्ट तंत्रज्ञान यामध्ये वापरण्यात आले आहे. या किटसाठी स्टँडर्ड लॅबोरेटरी यंत्रणा लागणार असून लॅबोरेटरीमध्ये चाचणी केल्यास 45 ते 50 मिनिटांत पहिला रिझल्ट मिळू शकणार आहे. तर आरएनए एक्सट्रॅक्ट सॅम्पलचा एकूण रिझल्ट मिळण्यास 75 मिनिटे लागणार आहेत.

- Advertisement -

हे किट भारतातच विकसित करण्यात आले आहे. हे किट वापरण्यासाठी स्किल स्टाफचीही गरज लागणार नाही. यामुळे ग्रामीण भाग, दुर्गम भागातही आरोग्य सेवक कोरोना चाचणी करू शकणार आहेत. तसेच या टेस्ट किटसाठी फार मोठी यंत्रेही लागणार नाहीत. किंमत किती? कृष्णमूर्ति यांना या टेस्ट किटच्या किमतीबाबत विचारले असता त्यांनी किंमत सांगण्यास नकार दिला. वेगवेगळ्या राज्य सरकारांनी खासगी लॅबसाठी दर ठरवून दिलेले आहेत. त्यामुळे राज्य सरकारे सांगतील ती किंमत असेल असे ते म्हणाले. यासाठी वेगवेगळ्या लॅबोरेटरिजसोबत संपर्क करून अभिप्राय मागविण्यात आले आहेत. आम्हाला समस्या सोडवायची आहे, कोरोनाशी लढायचे आहे, यामुळे किंमत कमीच असेल असेही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -