मेट्रो , ग्रंथालये आजपासून सुरू होणार राज्य सरकारने जारी केले नवीन परिपत्रक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले लॉकडाऊन हळूहळू उठवण्यात येत आहे. राज्यात मिशन बिगेन अगेन अंतर्गत राज्य सरकारने नवीन परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये गुरुवारपासून राज्यातील सर्व ग्रंथालये आणि टप्प्याटप्प्याने मुंबईतील मेट्रो सेवा सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. तसेच, कंटेन्मेंट झोन बाहेरील आठवडी बाजार सुद्धा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. तसेच कंटेन्मेंट झोनबाहेरील दुकाने सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात ग्रंथालये सुरू करण्याची मागणी होत होती. त्यानुसार राज्य सरकारने राज्यातील सर्व ग्रंथालये १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात परवानगी दिली आहे. त्यामुळे विद्यार्थी, पुस्तकप्रेमींसाठी ही दिलासादायक बाब आहे. मात्र, शाळा , महाविद्यालये सुरू करण्यास अद्याप परवानगी देण्यात आली नाही. पण, शाळेतील शिक्षक वर्गाला ५० टक्के उपस्थितीची मुभा देण्यात आली आहे. याचबरोबर, टप्प्याटप्प्याने मुंबईतील मेट्रो सेवा सुरू करण्यास राज्य सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून प्रवासादरम्यान मुंबईकरांना होणारा त्रास थोडासा कमी होणार आहे. मेट्रो सेवा सुरु करण्याबाबतची SOP लवकरच नगरविकास विभागाकडून जारी करण्यात येणार आहे. याशिवाय, कंटेन्मेंट झोनबाहेरील आठवडी बाजार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. यामध्ये कंटेन्मेंट झोनबाहेरील दुकाने सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.

कंटेन्मेंट झोन वगळता पुढील गोष्टी सुरू होणार :
केंद्र सरकारने परवानगी दिलेल्यांना आंतरराष्ट्रीय प्रवासाची मुभा
ऑनलाइन आणि दूरस्थ शिक्षणाला परवानगी देण्यात आली आहे
शाळेतील 50 टक्केे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांना 15 ऑक्टोबरपासून शाळेत बोलावण्यास परवानगी
उच्च शिक्षण संस्थांचे ऑनलाइन प्रशिक्षण सुरूच राहील
मात्र पीएचडी, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं शिक्षण घेणार्‍या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना आणि तंत्रशिक्षण, लॅबोरटरीशी संबंधितांना 15 ऑक्टोबरपासून शिक्षण संस्थेत उपस्थित राहण्यात मुभा देण्यात आली आहे.
मेट्रो आणि ग्रंथालय, गार्डन, पार्क्स उद्यापासून उघडणार
व्यावसायिक प्रदर्शने (बिझनेस टू बिझनेस एक्झिबिशन्स) भरवण्यास परवानगी
स्थानिक आठवडा बाजार, गुरांचा बाजारालाही परवानगी

या गोष्टी बंद राहणार:
धार्मिक स्थळे आणि मंदिरे बंदच राहणार
शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस 31 ऑक्टोबरपर्यंत बंद
सिनेमा हॉल, स्वीमिंग पूल, मनोरंजन पार्कस, थिएटर सभागृहे 31 ऑक्टोबरपर्यंत बंद
सामाजिक, राजकीय कार्यक्रम, खेळाच्या स्पर्धा तसेच मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी
लग्न समारंभांना 50 व्यक्तींची मर्यादा आणि अंत्यविधीसाठी 20 जणांची मर्यादा कायम