Live Update: Corona Test करायची असेल तर आधार कार्ड असणार आवश्यक

Live Update News

२१ सप्टेंबरपासून ९ ते १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी अंशत: शाळा सुरु; नियमावली जारी

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. मात्र, एकीकडे कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना दुसरीकडे मात्र अनलॉक:४ ची प्रक्रिया सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने मंगळवारी नववी ते बारावीपर्यंत अंशत: शाळा सुरु करण्यासंदर्भात स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर (एसओपी) जारी केली आहे. त्यामुळे आता २१ सप्टेंबरपासून शाळा सुरु व्हायला सुरुवात होईल. मात्र, शाळांमध्ये शिकविण्यासंदर्भात शाळा निर्णय घेतील. क्लास वेगवेगळ्या वेळात चालतील आणि कोरोनाचे लक्षण असणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात येणार नाही. (सविस्तर वाचा)


आता Corona Test करायची असेल तर आधार कार्ड असणार आवश्यक

देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीत जर कोणाला कोरोना चाचणी करून घ्यायची असेल तर त्यांना दिल्लीतील त्यांच्या पत्त्याचा पुरावा देण्यासाठी आधार कार्ड दाखवणं आवश्यक असणार आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने हा आदेश दिला असून आधार कार्ड व्यतिरिक्त कोरोना चाचणीसाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचा अर्ज (आयसीएमआर) भरणे देखील आवश्यक असणार आहे. (सविस्तर वाचा)


वेब महासभेचे कामकाज अनाकलनीय; नारायण पवार यांची टीका

महापालिकेच्या आज झालेल्या वेब महासभेचे कामकाज अनाकलनीय होते, अशी टीका भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे. जानेवारी-फेब्रुवारी, मार्चमधील खंडित महासभांमधील विषय घाईघाईत मंजूर करण्यात आले. कोणते विषय मंजूर झाले, ते बहूतांशी नगरसेवकांना समजले नाही. त्यामुळे विधीमंडळाच्या धर्तीवर नगरसेवकांची कोरोना चाचणी घेऊन गडकरी रंगायतन किंवा डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात महासभा भरवावी, अशी विनंती नगरसेवक नारायण पवार यांनी महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे केली आहे. (सविस्तर वाचा)


आज २०,१३१ नव्या रूग्णांचे निदान

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी झालेला नाही. राज्यात आज २० हजार १३१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत ६,७२,५५६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात आज २,४३,४४६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज ३८० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या २७,४०७ वर पोहोचली आहे. त्यामुळे सध्या राज्यातील मृत्यूदर २.९ टक्के एवढा आहे. (सविस्तर वाचा)


मुंबईत आढळले १,३४६ नवे रुग्ण

मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार ३४६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४२ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ५८ हजार ७५६ वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत ७ हजार ९३९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईत गेल्या २४ तासांत ८८७ रुग्ण बरे झाले असून एकूण १ लाख २५ हजार ९०६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. (सविस्तर वाचा)


पूर्व लडाखच्या LAC सीमेजवळ चीनचे शस्त्रधारी सैनिक तैनात

चीन वारंवार भारतीय सीमेवर कुरहोडी करताना पाहायला मिळत आहे. नुकतेच पूर्व लडाख भागात LAC च्या जवळ चीनचे शस्त्रधारी सैनिक तैनात असल्याचे आढळून आले असून याबाबतचे वृत्त एएनआयने दिले आहे. LAC म्हणजेट प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ हे सैन्य तैनात करण्यात आले आहेत. चिनी सैन्याच्या हातात स्टिक मॅचेट्स नावाचे शस्त्र असून पूर्व लडाख भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ हे सैनिक तैनात करण्यात आले आहेत. या ठिकाणी सुमारे ४० ते ५० सशस्त्र चिनी सैनिक तैनात करण्यात आले असून त्यांच्या हाती धारदार शस्त्र असल्याचे सांगितले जात आहे. (सविस्तर वाचा)


पुणेकरांच्या चिंतेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. पुणे शहरात २ लाख कोरोनाबाधित रुग्ण झाले असून देशातील सर्वाधिक रुग्णसंख्येचा पुणे हा पहिला जिल्हा ठरला आहे.


Mumbai Corona: दिवसाला हजार चाचण्यांचे टार्गेट विभागांना पेलेना; कार्यालयांकडून चालढकल

मुंबईत कोरोना कोविडच्या चाचण्या वाढवण्याची मागणी होत आहे, तरी प्रत्यक्षात आयुक्तांनी ज्या ठराविक दहा विभाग कार्यालयांना दैनंदिन एक हजार चाचण्यांचे टार्गेट दिले, त्यांच्याकडूनच ते पूर्ण केले नाही. जास्तीत जास्त चाचण्या करताना विभाग कार्यालयांकडून १०० ते ३५० चाचण्या केल्या जात आहेत. परिणामी चाचण्यांची संख्या कमी होऊन बाधित रुग्णांची संख्याही कमी दिसत आहे. (सविस्तर वाचा)


मुख्यमंत्र्यांचे मुंबई तर उपमुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे लक्ष

राज्यातील दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन आज, मंगळवारी समाप्त झाले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आभाराच्या भाषणानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली. त्यांनी या दोन दिवसीय अधिवेशनात सरकारच्या कामगिरीवर समाधानी नसल्याचे मत मांडत, सरकारने आमच्या कोणत्याही समस्येचे निरसन केले नसल्याचे त्यांनी म्हटले. तसेच कोरोनाची स्थिती महाराष्ट्रात भयंकर असून मुख्यमंत्र्यांचे मुंबईकडे तर उपमुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे लक्ष असून राज्यातील उर्वरित जिल्हे त्यांची वाऱ्यावर सोडले आहेत, असा घणाघाती आरोप यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर केला. (सविस्तर वाचा)


राज्यातील प्रत्येक घराघरात कोरोनाचे ट्रेसिंग होणार

येत्या १५ सप्टेंबर नंतरच्या काळात मी महाराष्ट्रामध्ये एक कार्यक्रम राबवू इच्छितो, त्याच्यात मला आपली सगळ्यांची मदत, सहकार्य पाहिजे. आपण “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” असे ठेवत आहोत. राज्यातील जनतेला आवाहन करत मुख्यमंत्र्यांनी पावसाळी अधिवेशनाची सांगता करताना जनतेला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. यंत्रणांवरील ताण थोडासा हलका करतानाच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक घराचे ट्रेसिंग करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे आवाहन राज्यातील जनतेला केले. मुख्यमंत्र्यांनी पावसाळी अधिवेशनाच्या समारोपाच्यावेळी सर्वपक्षीय सदस्यांचे धन्यवाद देखील मानले. (सविस्तर वाचा)


नीलम गोऱ्हे यांची उपसभापती म्हणून एकमताने निवड.विरोधकांनी सभात्याग केल्यानं त्यांच्या अनुपस्थितीत नीलम गोऱ्हे यांची निवड करण्यात आली आहे.


बीएमसीने कंगनाला नोटीस दिली आहे. बीएमसीच्या म्हणण्यानुसार कंगना रणावतचं कार्यालय बेकायदेशीरपणे बनविण्यात आले आहे. बीएमसीने कंगनाच्या कार्यालयावर नोटीस लावली आहे.


कोरोना, वाढीव वीजबिलासह इतर मुद्द्यांवरुन भाजपचं विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

कोरोना नियंत्रणामध्ये आलेलं अपयश, भरमसाठ विज बिलासह इतर मुद्यांवर भाजपने विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरु केलं आहे. ठाकरे सरकार चले जावच्या घोषणा दिल्या जात आहेत.


विधान परिषदेतील उपसभापतीच्या निवडणुकीला भाजपचं हायकोर्टात आव्हान

विधान परिषदेतील उपसभापतीच्या निवडणुकीला भाजपने आव्हान दिलं आहे. पॉझिटिव्ह आमदार मतदान करु शकत नसल्याने हायकोर्टात आव्हान


देशात २४ तासात ७५ हजार ८०९ रूग्ण आढळले आहेत. तर २४ तासात १ हजार १३३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनातून मुक्त झालेल्या ७३ हजार ५२१ लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील रूग्णांची संख्या ४२ लाख ८० हजार ४२२ वर पोहचली आहे.


अमरावती जिल्ह्यांमध्ये सकाळी सहा वाजल्यापासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. दिड तास जिल्ह्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. काल सायंकाळी देखील अमरावती जिल्ह्यात सर्वत्र भागात मुसळधार पाऊस झालाय.


कंगना रणावतची बहिण आणि पीएचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह


राज्यात एका दिवसात ४२३ जणांचा कोरोनाने मृत्यू!

सोमवारी मागील दोन दिवसांच्या तुलनेत आज राज्यात रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं पाहायला मिळालं. असं असलं तरी मृतांच्या संख्येत मात्र वाढ झाली आहे. सोमवारी दिवसभरात राज्यात १६ हजार ४२९ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर १४ हजार ९२२ कोरोनामुक्त रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या आता ६ लाख ५९ हजार ३२२ इतकी झाली आहे.