सर्वसामान्यांसाठी लोकलचे दरवाजे बंदच

पुढच्या वर्षीच करता येणार लोकल प्रवास

मुंबई लोकल (प्रातिनिधिक छायाचित्र)

गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी लोकल रेल्वे सुरू होण्याच्या अपेक्षेत असलेल्या मुंबईकरांच्या वाट्याला पुन्हा एकदा नैराश्य आले आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने प्रशासन सतर्क झाले असून, कोणतीही जोखीम घ्यावी लागू नये, म्हणून मुंबईतील लोकल सुरू करणे लांबणीवर पडले आहे. दिल्लीत कोरोनाचा उद्रेक झाला असून मुंबईत देखील परिस्थिती चिंताजनक होताना दिसत आहे. गेल्या ५ महिन्यात मुंबईसह राज्यात कोरोना काही प्रमाणात रोखला गेला होता. राज्यातील रिकव्हर रेट हा ९३वर पोहोचला होता.

रुग्णसंख्याही बर्‍याच अंशी कमी झाली होती. मात्र, दिवाळीनंतर गुजरात आणि दिल्लीत हाह:कार निर्माण झाला आहे. राज्यातही पुन्हा एकदा रुग्णसंख्येत वाढ होत आहे. यामुळे आता मुंबईत कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या परिस्थितीत गर्दीचा प्रवास म्हणून गणली गेलेली लोकल लागलीच सुरू करण्यास पालिका प्रशासनाने स्पष्टपणे नकार दिला आहे. बृहन्मुंबई पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनीही याबाबत सुतोवाच करत लोकल सुरू करण्याचा निर्णय प्रलंबित ठेवण्याचे संकेत एका मुलाखतीत दिले आहेेत.

कोरोना संसर्गाने देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आले असून, मृतांची संख्याही तुलनेने महाराष्ट्रातच सर्वाधिक होती. यातही मुंबईतील मृतांचा आकडा हा राज्यात मोठा होता. हे लक्षात घेता देशात निर्माण झालेल्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोणतीही जोखीम घ्यायची नाही असे ठरवत मुंबईची लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी खुली करू नये, असे प्रशासनाचे स्पष्ट मत पडले आहे. विशेषत: मुंबईत या साथीने सुरुवातीला हाहा:कार माजवला होता. पालिका प्रशासनाबरोबरच शासकीय इस्पितळे, त्यातील डॉक्टर, परिचारिका अशा सर्वांनीच प्रचंड मेहनत घेऊन साथ रोखण्यासाठी सारी शक्ती पणाला लावली.

आता मुंबईत अशी परिस्थिती यायला नको, म्हणून बृहन्मुंबई पालिकेने चोख बंदोबस्त राखला आहे. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मुंबईतील वाढत्या रुग्णसंख्येवर चिंता व्यक्त केली. मुंबईसाठी पुढील तीन ते चार आठवडे खूप महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. शहरात कोणत्याही प्रकारचे निर्बंध लागू करण्यात येणार नाहीत, असे सांगताना मात्र मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणार्‍या रेल्वेतील प्रवास सामान्यांसाठी सुरू करता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तीन ते चार आठवड्यांनंतर मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल. त्यानंतरच सामान्य प्रवाशांसाठी लोकल सुरू करायची की नाही, यासंबंधी निर्णय घेतला जाईल. स्वीमिंग पूल, शाळा आणि रेल्वे सेवा सुरू करण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले होते. मात्र, आता या तिन्ही गोष्टी बंद राहतील. इतर ठिकाणांवर सध्या कोणताही परिणाम होणार नाही, असे चहल यांनी स्पष्ट केले.

३१ डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याच्या निर्णयावर बोलताना आयुक्त चहल यांनी पूर्व तयारीवर आमचा विश्वास आहे आणि त्यामुळेच ३१ डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्यात येणार आसल्याचे स्पष्ट केले. बिकट परिस्थितीवर मात करण्यासाठी नेहमीच योजना आखल्या जातात. यामुळे एकाही मुलाला धोक्यात टाकायचे नाही म्हणून आम्ही निर्णय घेतला. येऊ घातलेल्या कोरोनाच्या लसीवर बोलताना त्यांनी कोरोना लस झोपडपट्टीत, गरिबांपर्यंत पोहोचवण्याला सर्वाधिक महत्व दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.