घरताज्या घडामोडीमहाविकास आघाडीकडून होणाऱ्या बदल्यांना कंटाळून DGP सुबोध जयस्वाल गेले रजेवर

महाविकास आघाडीकडून होणाऱ्या बदल्यांना कंटाळून DGP सुबोध जयस्वाल गेले रजेवर

Subscribe

अजितदादांची नाराजी भोवली, अधिकार्‍यांच्या बदल्यांवरून मतभेद

राज्यातील गृह खात्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्यांवरून राज्य सरकार आणि पोलीस महासंचालक यांच्यातील मतभेदांचा उडालेला भडका अद्याप कायम आहे. याचा परिणाम होऊन राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल महिनाभराच्या रजेवर गेले आहेत. महासंचालक जयस्वाल यांच्याकडील पदभार सध्या राजेंद्र सिंग यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मात्र जयस्वाल हे स्वतःहून रजेवर गेले की त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नाराजीमुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रजेवर पाठवले याबाबत मंत्रालयात उलट-सुलट चर्चा आहे.

राज्यात कोरोनाचा उद्रेक सुरू राहिल्यामुळे यंदा पोलिसांच्या मे महिन्यात होणार्‍या सर्वसाधारण बदल्या होऊ शकल्या नाहीत. सुरूवातीला राज्य सरकारने या चालू आर्थिक वर्षात अर्थात ३१ मार्च २०२१ पर्यंत पोलिसांच्या बदल्या करायचा नाहीत, असा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर राज्य सरकारने स्वतः निर्णय फिरवला आणि एकूण बदल्यांच्या १५ टक्के बदल्यांना मान्यता देण्यात आली. या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय वशिलेबाजीचा आरोप झाल्याने विरोधकांनी बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याची आवई उठवली. त्यामुळे कर्तव्यनिष्ठ आणि प्रामाणिक पोलिस अधिक अशी ख्याती असलेले महासंचालक जयस्वाल यांनी या बदल्या केल्या नाहीत. मात्र त्यानंतरही राज्य सरकारच्या आग्रहामुळे पोलीस महासंचालकांनी अत्यावश्यक असलेल्या बदल्या व पदोन्नत्या केल्या. मात्र त्यानंतरही अद्याप २५ ते ३० वरिष्ठ आयपीएस अधिकार्‍यांना विना पोस्टिंग ठेवण्यात आले.

- Advertisement -

एवढ्या मोठ्या संख्येने मपोसे आणि भापोसे अधिकारी विना पोस्टिंग राहणे हे सरकारच्या दृष्टीने भूषणावह नव्हते. त्यामुळे आयपीएस पोलिस अधिकार्‍यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.

राज्यात पहिल्यांदाच शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा तीन पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले असल्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातून तिन्ही पक्षांकडून तीन स्वतंत्र याद्या बदल्यांसाठी गृहमंत्र्यांकडे मुख्यमंत्र्यांकडे तसेच उपमुख्यमंत्र्यांकडे देण्यात आल्या आहेत. त्यात पालकमंत्र्यांची यादी वेगळी, सत्ताधारी पक्षांच्या आमदारांकडून आलेली यादी वेगळी, तर काही ठिकाणी खासदारांकडूनही शिफारशी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एका जिल्ह्यात अक्षरशा पंचवीस-तीस अधिकार्‍यांच्या बदल्यांच्या शिफारसी राज्य सरकारकडे आल्या आहेत. त्यामुळे यातून नेमक्या कोणत्या पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या करायच्या याबाबत गृह खात्यात आणि सरकारमध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रम आहे.

- Advertisement -

ज्या जिल्ह्यांमध्ये शिवसेनेचे पालकमंत्री आहेत तेथील नियुक्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदारांकडून विरोध होतो. तर जेथे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे पालकमंत्री आहेत तेथे शिवसेनेच्या आमदारांकडून पालकमंत्र्यांच्या शिफारशींना विरोध केला जातो. त्यामुळे या घोळात जिल्ह्यांमधील वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या रखडले आहेत. त्यातच जवळपास साडेतीनशेच्या आसपास पोलीस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक तसेच डीवायएसपी डीसीपी यांच्याही बदल्या अपेक्षित असून या तिन्ही पक्षांमधील आपापसातील कुरघोडीत अडकून पडल्या आहेत. पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल हे या सार्‍या प्रकाराला कंटाळले असून त्यामुळेच ते रजेवर गेल्याचे सांगण्यात येत आहे.

Sunil Jawdekarhttps://www.mymahanagar.com/author/sunil-jawdekar/
गेली २८ वर्षे वर्तमानपत्र क्षेत्रात कार्यरत. विविध राजकीय, सामाजिक, प्रशासकीय मुद्द्यांवर आणि पायाभूत सेवासुविधांवर लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -