धक्कादायक: २०१९ वर्षात महाराष्ट्रातून सर्वाधिक महिला बेपत्ता; NCRB डेटा

crime against women in India
प्रातिनिधिक छायाचित्र

महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असल्याचे आपण म्हणतो. भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात गुन्ह्यांचे त्यातही महिलांवरील गुन्ह्यांचे प्रमाण कमी असल्याचे आपला समज असेल. पण राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने (NCRB) जी आकडेवारी प्रसिद्ध केली आहे, त्यावरुन तुमच्या या समजाला तडा जाऊ शकतो. वर्ष २०१९ साली महाराष्ट्रातून इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक महिला बेपत्ता झाल्याचा धक्कादायक अहवाल एनसीआरबीने दिला आहे. २०१९ मध्ये एकूण ६६ हजार ४७८ लोक राज्यात बेपत्ता झाल्याची नोंद आहे. त्यापैकी ३८ हजार ५०६ या महिला असल्याचे अहवालातून समोर आले आहे. दुसऱ्या क्रमाकांवर मध्य प्रदेश असून तिथे ४७ हजार ४५२ लोकांची बेपत्ता म्हणून नोंद झाली. त्याखालोखाल पश्चिम बंगालमधून ४७ हजार ३३७ लोक बेपत्ता झाले आहेत. दोन्ही राज्यांची तुलना केल्यास राज्याचा आकडा दोघांपेक्षाही २० हजारांनी अधिक आहे.

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने (NCRB) दिलेल्या आकडीवारीनुसार राज्यातून ३८,५०६ महिला मागच्यावर्षी बेपत्ता झालेल्या आहेत. तर मध्य प्रदेशातून ३३,८९३ आणि पश्चिम बंगालमधून ३१,२९९ महिला बेपत्ता झालेल्या आहेत. महाराष्ट्रातून बेपत्ता झालेल्या महिलांचा आकडा हा देशात सर्वाधिक आहे. देशभरातील आकडेवारीनुसार संपुर्ण भारतात ३ लाख ८० हजार ५२६ लोक बेपत्ता झाले होते, त्यापैकी २ लाख ४८ हजार ३९७ महिला होत्या.

धक्कादायक बाब म्हणजे बेपत्ता झालेल्या महिलांमध्ये तरुणींचे सर्वाधिक प्रमाण आहे. १९ ते ३० वर्षांच्या दरम्यान वय असलेल्या १ लाख ३३ हजार ८३२ महिला बेपत्ता झाल्या आहेत. तर याच वयोगटातील पुरुषांचे प्रमाण हे ४४ हजार ८१४ एवढे आहे.

महिलांसोबतच मुलांचेही बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिक आहे. या प्रकरणात महाराष्ट्र चांगल्या स्थितीत आहे. मध्य प्रदेशमधून १८ वर्षांखालील सर्वाधिक मुले बेपत्ता झाली आहेत. हे प्रमाण ११ हजार २२ एवढे आहे. त्या खालोखाल पश्चिम बंगाल ८ हजार २०५, बिहार ७,२९९ आणि महाराष्ट्रातून ४,५६२ एवढी मुले बेपत्ता झाली आहेत. संपुर्ण भारतात मागच्या वर्षी एकूण ७३,१३८ मुले हरवली आहेत. त्यापैकी ५२,०४९ मुली होत्या.