घरताज्या घडामोडीशिवसेनेचे हिंदुत्व संस्कृतीचे, विकृतीचे नाही!

शिवसेनेचे हिंदुत्व संस्कृतीचे, विकृतीचे नाही!

Subscribe

वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भाजपला टोला

’शिवसेनेचे हिंदुत्व हे संस्कृतीचे असून विकृतीचे नाही. आम्ही कधीच विकृतीने संस्कृतीवर हल्ला केलेला नाही. ती आम्हाला प्रबोधनकार आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली शिकवण आहे. आम्ही हिंदुत्त्ववादी आहोत, असे सांगत कोणाला आयुष्यातून उठवण्याचे काम केलेले नाही…’ असा जोरदार टोला उद्धव ठाकरे यांनी मारला. अर्थात हा टोला भाजपच्या दिशेने जात होता, हे दिसत होते. मात्र, हा टोला मारताना ठाकरे यांच्या बोलण्यात कुठेही असूयेचा भाग नव्हता. सरळ मारलेला तो फटका होता!

महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. आमच्या हिंदुत्वाच्या संस्कृतीत दुसर्‍याची असूया करायला शिकवलेले नाही. जे काही आहे ते थेट. मागून बिगून काही नाही. जे आहे ते तोंडावर. आम्हाला तेच शिकवले आहे. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कधीच भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नाहीत. वैयक्तिक टीका केलेली नाही आणि करणार नाही. मात्र, एकेकाळी आमचे युतीतील मित्र असलेले भाजपचे नेते वाटेल ती टीका करत सुटलेले आहेत. मात्र, आम्हाला कोणी कमजोर समजू नये.

- Advertisement -

याआधी तुम्हाला सरकार चालवण्याचा अजिबात अनुभव नव्हता. पण, आता एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर याकडे कसे बघता यावर मुख्यमंत्री उत्तरले, ’ मी याआधी निर्णय घेण्याच्या जागेवर नसलो तरी सरकार चालवण्याचे काम करताना मी बघितले आहे. बाळासाहेब यांच्याकडे बघून ते शिकलो आहे. या एका वर्षाने खूप काही शिकायला मिळाले आहे. महाविकास आघाडी सरकारमधील सहकारी पक्ष आणि प्रशासनातील अधिकारी यांच्या सहकार्यामुळे मला मुख्यमंत्री म्हणून काम करताना कुठलीही अडचण आलेली नाही. मुख्य म्हणजे अडचणींमधून मार्ग काढता येतो, यावर माझा विश्वास आहे’.

महाविकास आघाडी सरकारला केंद्राचे सहकार्य मिळते का? यावर उद्धव ठाकरे सांगतात : तशी अपेक्षा प्रत्येक राज्याला असते. कारण हा देश पक्षवार नाही तर भाषावार प्रांत रचनेनुसार आकारला आहे. लोकशाहीला तेच अपेक्षित आहे. केंद्र सरकारची तशीच भूमिका असायला हवी. कोरोना काळात आर्थिक निर्बंध आलेले असले तरी महाराष्ट्र सरकार आता त्यामधून मार्ग काढत आहे. आमच्या पहिल्या बजेटमध्ये अनेक चांगल्या योजनांचा आम्ही संकल्प केला होता. विभागवर बैठका घेऊन आम्ही त्याची सुरुवातही केली. कोरोनाने त्याला अटकाव केला असला तरी पुढील काळात राज्याच्या विकासाच्या योजना आम्ही निश्चितच मार्गी लावू. आमच्यासमोर राज्याची आरोग्य यंत्रणा भक्कम करण्याचे पहिले लक्ष्य आहे. मुंबईत ५ हजार बेड्सचे संसर्ग हॉस्पिटल आम्ही सुरू करणार आहोत. तसेच राज्यात अशा प्रकारची यंत्रणा उभी केली जाईल.

- Advertisement -

भरमसाठ वीज बिलांमुळे राज्यातील जनता नाराज झाली आहे. यातून सरकार काय मार्ग काढणार आहे? यावर उद्धव ठाकरे म्हणाले, लोकांना आलेली वीज बिले ही वाढीव नाहीत. कोरोना काळामुळे मीटर रिडींग झाले नव्हते. मात्र, आता कोणाला ही बिले वाढीव वाटत असतील तर त्यांनी संबंधित यंत्रणांकडे तक्रारी कराव्यात. कोणावरही अन्याय केला जाणार नाही. यातून काही मार्ग निघतो का याचा आम्ही सुद्धा विचार करत आहोत.

जनतेच्या सहकार्यामुळे आघाडी सरकारला अजिबात धोका नाही 
गेल्या काही महिन्यांपासून महाविकास आघाडी सरकार पडणार असा प्रचार केला जात आहे. भाजपचे नेते, पदाधिकारी आणि आमदार भेटणार्‍या प्रत्येकाला तसेच सांगत आहेत. यावर स्मित करत उद्धव म्हणाले, म्हणजे भीती कोणाला वाटत आहे, हे तुम्हीच समजा. आमचे महाविकास आघाडीचे सरकार मजबूत असून ते भाजपला वाटते म्हणून पडणारे नाही. जनतेचे आम्हाला पूर्ण सहकार्य आहे. आमच्या सरकारला येऊन तीन महिने झाले नाही तोवर कोरोना आला. सर्व काही ठप्प झाले. पण, कठीण काळात आम्ही संयमाने मार्ग काढण्याचा मनापासून प्रयत्न केला. त्यात कुठला बडेजाव नव्हता. लोकांसमोर जे काही सत्य परिस्थिती आहे ती मांडली आहे. महाराष्ट्रातील जनतेचे मोठे सहकार्य असल्याने महाविकास आघाडी सरकारला अजिबात धोका नाही…असे मनोगत उद्धव ठाकरे यांनी मांडले.

जोरात नाही, संयमाने पुढे जाणार
महाविकास आघाडी सरकार हे जोरात वेगाने पुढे जाणार नाही. जोरात गेलो तर तोंडावर पडण्याची भीती असते. यामुळे आमच्या सरकारने संयमाने पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.

महानगरपालिका निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवणार 
आगामी महानगरपालिका निवडणुकांना शिवसेना स्वबळावर सामोरे जाणार का, आघाडी म्हणून या निवडणुका लढवणार? यावर आपले मत व्यक्त करताना मुख्यमंत्री म्हणाले, ’महानगरपालिकांच्या सर्व निवडणुका आम्ही तिन्ही पक्ष शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढवणार आहोत. शिवसेना हि हिंदुत्व संस्कृती मानणारी असून भाजपाकडे ती नसल्याने त्यांच्यासोबत आता युती होणार नाही’.

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -