MI vs DC: चुरशीच्या सामन्यात मुंबईची दिल्लीवर मात; गुणतालिकेत सर्वोच्च स्थानी

MI vs KKR mumbai indians won by 49 runs

IPL 2020 च्या १३ व्या हंगामात आतापर्यंत चॅम्पियन कामगिरी करणारे मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन बलाढ्य संघाचा सामना झाला. दोन्ही चॅम्पियन्स आमनेसामने आल्यामुळे आजचा सुपर संडे क्रिकेट चाहत्यांनी चांगलाच एन्जॉय केला. दिल्ली कॅपिटलने पहिल्यांदा फलंदाची करताना १६३ धावांचे आव्हान मुंबईला दिले होते. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा लवकर बाद झाल्यानंतर क्विटंन डि कॉक आणि सुर्यकुमार यादव यांनी अर्धशतकी खेळी करत मुंबईला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. अखेर मुंबई इंडियन्सने ५ विकेट राखत हा सामना जिंकत गुणतालिकेत सर्वोच्च स्थान पटकाविले.

क्विटंन डि कॉक आणि सुर्यकुमार यादव दोघांनीही ५३ धावांची खेळी केली. त्यानंतर आलेल्या इशान किशनने देखील १५ चेंडूत २८ धावा ठोकल्या. त्यामुळे मुंबईचा विजय आणखी समीप आला होता. शेवटच्या तीन षटकात कायरन पोलार्ड आणि कुणाल पांड्या यांनी संयमी आणि उत्कृष्ट खेळी करत शेवटच्या षटकातील दोन चेंडू बाकी ठेवत हा सामना खिशात घातला.

 

दिल्ली कॅपिटल्सचा कप्तान श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दिल्लीला हवी तशी सुरुवात मिळू शकली नाही. पृथ्वी शॉ ३ चेंडूत ४ धावा करुन बोल्टचा शिकार ठरला. त्यानंतर अंजिक्य रहाणेला पहिल्यांदाच या आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली. रिषभ पंत फॉर्मात नसल्यामुळे त्याला आराम देऊन रहाणेला संधी देण्यात आली होती. मात्र रहाणेला मोठी खेळी साधता आली नाही. केवळ १५ धावा करुन तो बाद झाला. त्यानंतर शिखर धवनने डाव सावरला आणि ५२ चेंडूत ६९ धावा ठोकल्या. शिखरला देखील आज पहिल्यांदाच चालू हंगामातला आपला फॉर्म गवसला. श्रेयस अय्यरने ४२ धावांची जोड तर आज पहिल्यांदा खेळणारा एलेक्स करीने १४ धावा ठोकल्या. त्यामुळे दिल्लीने मुंबईसमोर १६३ धावांचे आव्हान ठेवले होते.

रहाणे आणि धवनची विक्रमाला घातली गवसणी

अजिंक्य रहाणे आज पहिल्याच सामन्यात १५ धावा करुन बाद झाला असला तरी त्याने स्वतःच्या नावावर एक विक्रम नोंदविला आहे. टी-२० सामन्यात रहाणेने ५ हजार धावा पुर्ण केल्या आहेत. पाच हजार धावा पुर्ण करणारा तो दहावा भारतीय फलंदाज ठरला आहे. तर शिखर धवनने आज आपले ३८ वे अर्धशतक पुर्ण केले. याआधी विराट कोहली, रोहित शर्मा आणि सुरेश रैनाच्या नावावर ३८ अर्धशतकांचा विक्रम होता.