वीज खंडितप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

मुंबईसह ठाणे-नवी मुंबईत अडीच तासांचा वीजखंडोबा

uddhav thackeray
उध्दव ठाकरे (फाईल फोटो)

मुंबई महानगर क्षेत्रात वीज खंडित झाल्याप्रकरणाची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून, या घटनेची तातडीने चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. कळवा उपकेंद्रातील ग्रीडमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्याने मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील वीज सकाळी गूल झाली होती. याचा फटका मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वेलाही बसला. शाळा महाविद्यालयांच्या ऑनलाईन तासिकाही रद्द झाल्याच; पण आज होणार्‍या अंतिम वर्षाच्या विद्यापीठ परीक्षाही पुढे ढकलण्याची वेळ मुंबई विद्यापीठावर ओढावली. वीजपुरवठा खंडित झाल्याचा सर्वाधिक परिणाम मुंबई परिसरातील कोविड रुग्णालयांना बसला. याशिवाय सरकारी कार्यालये, बँका, यांनाही या बिघाडाचा फटका बसला.

वीज गायब झाल्याचे कळताच मुख्यमंत्र्यांनी लागलीच ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याशी चर्चा केली. दोष काढण्याच्या सूचना देताना त्यांनी तातडीने या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले. हा वीज पुरवठा सुमारे अडीच तास गायब होता. नंतर तो हळूहळू पूर्वपदावर आला. मात्र, यापुढे अशा घटना घडू देऊ नका, अशा सूचना त्यांनी ऊर्जामंत्र्यांना दिल्या. वीज गायब होण्यामागचे कारण आणि त्याला जबाबदार कोण याची तात्काळ चौकशी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

गायब झालेल्या विजेमुळे मुंबई परिसरातील कोविड रुग्णालयांना चांगलीच अडचण झाली. या रुग्णालयांमध्ये तात्काळ व्यवस्था करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्त इकबाल चहेल आणि राज्याचे मुख्य सचिव संजीव कुमार यांना दिल्या. मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, पनवेल या पालिका क्षेत्रातील वीजही गायब होती. राज्यातील नियंत्रण कक्ष आणि अग्निशमन व्यवस्थेलाही तात्काळ सूचित करण्यात आले. आवश्यक असलेल्या यंत्रणेला तातडीने मदत करण्याचेही मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना निर्देश दिले. याशिवाय शहराची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरी रेल्वे प्रवाशांच्या मदतीसाठीही उपाययोजना लागू करण्याचे त्यांनी मुख्य सचिवांना सांगितले.

परीक्षा मंगळवारी
शहरातील वीज गायब झाल्याने आज होऊ घातलेल्या मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षा आज रद्द करण्याचा निर्णय विद्यापीठाला घ्यावा लागला. आता या परीक्षा मंगळवारी घेण्यात येणार आहेत. हे पेपर सोमवारी सकाळी 11 ते 12 या वेळेत होणार होते. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देणे शक्य होणार नाही त्यांनी चिंता करू नये. त्यांची परीक्षा पुन्हा घेतली जाईल, असे विद्यापीठाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

अडीच तासांनंतर वीज पूर्ववत
दरम्यान वीज कंपन्यांचे अभियंते आणि कर्मचार्‍यांच्या अथक प्रयत्नानंतर अडीच तासात वीज पुरवठा पूर्ववत झाला. बेस्ट, अदानी, एमएसईबीच्या भागात वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे लोकलच्या वाहतुकीवरही परिणाम झाला. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा पूर्णत: ठप्प झाली होती. रेल्वेची सिग्नल यंत्रणाही बंद पडल्यामुळे ती पूर्ववत व्हायला बराच काळ गेला. मुंबई शहर, दहिसर, चेंबूर, प्रभादेवी, मालाड, कांदिवली, वांद्रे, विलेपार्ले, पवई या तर ठाणे शहरातही अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला होता. नवी मुंबईतील वाशी, नेरुळ, खारघर, पनवेल ही उपनगरेही अंधारात होती.

कळवा उपकेंद्रातील दुरुस्तीचा फटका
महापारेषणच्या 400 मेगावॅटच्या कळवा पडघा उपकेंद्रामध्ये सर्किट एकच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. यामुळे वितरणाचा सारा भार हा सर्किट दोनवर होता. याच दरम्यान सर्किट 2 मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई व ठाण्यातील बहुतांश भागात वीज गेली, अशी माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली.