Live Update: मुलुंडच्या अ‍ॅपेक्स हॉस्पिटलमध्ये जनरेटरच्या अति उष्णतेमुळे आग

Live Update News

मुलुंडच्या अ‍ॅपेक्स हॉस्पिटलमध्ये जनरेटरच्या अति उष्णतेमुळे आग

वीणा नगर, फेज २, तुळशी पाईपलाईन मुलुंड (पश्चिम) येथील अ‍ॅपेक्स हॉस्पिटलमध्ये जनरेटर जास्त गरम झाल्याने आग लागली. ही आग संध्याकाळी आग लागली. काही वेळाने ही लागलेली आग विझवण्यात यश आलं. रूग्णालयात दाखल झालेल्या ४० रुग्णांना अन्य रुग्णालयात हलविण्यात आले. (सविस्तर वाचा)


मुंबईत २३ हजार ६९३ Active रुग्ण

मुंबईत आज कोरोनाचे १ हजार ६२० नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आल्याने कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ३१ हजार ०७० वर पोहचली आहे. तर ३६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ९ हजार ४६६ वर पोहचला आहे. तर चिंतेची बाब म्हणजे सध्या मुंबईत २३ हजार ६९३ Active रुग्ण असून त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. तसेच दिलासादायक बाब म्हणजे आज १ हजार ९६८ रूग्ण कोरोनावर मात करून बरे झाले आहेत तर आतापर्यंत एकूण १ लाख ९५ हजार ७७३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. (सविस्तर वाचा)


राज्यात ७०८९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १५,३५,३१५ झाली आहे. राज्यात आज २,१२,४३९ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात १६५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४० हजार ५१४ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे. (सविस्तर वाचा)


मुंबई व परिसरात सकाळी १०.१५ च्या सुमारास अचानक खंडित झालेल्या वीज पुरवठ्यामुळे लोकल सेवा ठप्प झाली होती. त्यामुळे अनेक विद्यार्थी सीईटीच्या पहिल्या सत्रातील परीक्षेला पोहचू शकले नाही. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी सीईटी सेलकडून परीक्षा चुकलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सीईटी परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. (सविस्तर वाचा)


ओडिशा विधानसभेचे माजी अध्यक्ष शरतकुमार कार यांचे ८१ व्या वर्षी निधन झाले. कोरोनाची चाचणी घेण्यात आल्यानंतर ते पॉझिटिव्ह आले होते त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.


पॉल मिलग्रोम आणि रॉबर्ट विल्सन यांना अर्थशास्त्रातील नोबेल

यंदा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार पॉल आर मिलग्रोम आणि रॉबर्ट बी विल्सन यांना देण्यात आला आहे. नोबेल पुरस्कार समितीने सोमवारी यंदाच्या सहाव्या आणि शेवटच्या नोबेल पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली. मिलग्रोम आणि विल्सन यांना हे पुरस्कार ऑक्शन थिअरीमध्ये सुधारणा आणि लिलावाच्या नव्या पद्धतींचा शोध लावल्यामुळे देण्यात आला आहे.


राज्याचे परिवहन मंत्री पॉझिटिव्ह

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. अनिल परब यांना उपचाराकरिता लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, हसन मुश्रीफ, बच्चू कडू, नितीन राऊत, एकनाथ शिंदे यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. आता यापाठोपाठ परिवहन मंत्री अनिल परब यांचा देखील अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. (सविस्तर वाचा)


मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सायंकाळी ४ वाजता वर्षा येथे महत्वाची बैठक बोलाविली आहे. या बैठकीस ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री प्रसाद तनपुरे , ऊर्जा सचिव असीम गुप्ता सहभागी होणार आहेत


सर्व अत्यावश्यक सेवांचा वीज पुरवठा सुरळीत – नितीन राऊत, ऊर्जा मंत्री


पूर्व आणि पश्चिम उपनगरामध्ये टप्प्याटप्प्याने वीज पुरवठा सुरळीत होईल असे अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडने स्पष्ट केले आहे.


मुंबईतील वीजपुरवठा तब्बल अडीच तासानंतर सुरळीत, तिन्ही मार्गावरील लोकल सेवा पूर्ववत

मुंबईत अचानक वीज पुरवठा खंडीत झाल्याने तिन्ही मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाल्या होत्या. पण तब्बल अडीच तासानंतर मुंबईतील विविध भागातील वीज पुरवठा सुरळीत झाल्या आहेत. त्यामुळे तिन्ही मार्गावरील लोकल सेवा पूर्ववत झाल्या आहेत.


ग्रीड फेल म्हणजे नेमकं काय?

वीज निर्मिती केंद्रात तयारी झालेली वीज ही वीज पारेषण वाहिन्यांच्या माध्यमातून कळवा आणि नागपूर या दोन स्टेट लोड डिस्पॅच सेंटरला जाते. स्टेट लोड डिस्पॅच सेंटर हे राज्यात दोन ठिकाणी म्हणजे कळवा आणि नागपुरच्या अंबाझरी येथे आहे. या लोड डिस्पॅच सेंटरच्या ठिकाणाहून संपूर्ण राज्यातील वीज वितरण कंपन्यांच्या सबस्टेशनला वीज पुरवठा करण्यात येतो. राज्यात अनेक ऊर्जा स्त्रोतामधून वीज निर्मिती होणाऱ्या वीज संचातील वीज ही या लोड डिस्पॅच सेंटरच्या मार्गातून संपूर्ण राज्यात वितरीत होते. जसे महाराष्ट्राचे ग्रीड आहे. तसेच प्रत्येक राज्याचे ग्रीड हे एकमेकांशी कनेक्टेड असते. देशात वन नेशन वन ग्रीड ही संकल्पना अंमलात आणण्यात आली आहे. त्यामुळे देशातल्या कोणत्याही वीज निर्मिती केंद्रातील वीज ही कोणत्याही राज्यात आणून वापरणे शक्य होते. अनेकदा तांत्रिक कारणामुळे किंवा पॉवर आऊटेजच्या कामादरम्यान तांत्रिक बिघाडामुळे ग्रीड कोलॅप्स होण्याचे प्रकार होतात. याआधी ३० मे २०१८ रोजी कळवा येथे ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीच्या कामात जळाला होता. त्यामुळे मुंबईकरांना ब्लॅकआऊटचा सामना करावा लागला होता. आजही कळवा येथे दुरुस्तीच्या कामादरम्यानच बिघाड झाल्याने मुंबईची ग्रीड कोलॅप्स होण्याची घटना घडली.


लाईट गेल्यामुळे डॉन बोस्को, बाबासाहेब गावडे आणि ऑल ठाकूर या केंद्रावरील एमएचटी, सीईटी २०२० ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. ही परीक्षा १९ किंवा २० ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे. ज्या विद्यार्थ्यांना लोकलच्या समस्येमुळे परीक्षा केंद्रावर पोहोचणे शक्य झाले नाही, त्यांनी सायंकाळी ५ वाजण्यापूर्वी सीईटी सेलला मेलद्वारे कळवावे, असे सीईटी सेलकडून कळवण्यात आले आहे. डॉन बोस्को २२० मुलं, बाबासाहेब गावडे ५५ मुलं, ऑल ठाकूर ३८४ मुलं होती.


मुंबईत सकाळी वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर सुमारे २ तासांनी आता मुंबई उपनगरातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा वीज पुरवठा सुरळीत झाला आहे. भांडुप, विक्रोळी, मुलुंड, माझगाव, चर्नीरोड, काळा घोडा येथे वीज आलेली आहे.


मुंबईतील सर्व मोबाईल सेवा पुरवठादार कंपन्यांच्या सेवा आजच्या पॉवर शटडाऊन दरम्यान विस्कळीत झाल्या आहेत.


पॉवर ग्रिड फेल्युअरचा मुंबईतील कामकाजाला मोठा फटका. मुंबई उच्च न्यायालयातील ऑनलाईन सुनावणींवरही परिणाम. हायकोर्टाचं कामकाज सुरू झालेलं नाही.


रविवारी महिला पोलीस कॉन्स्टेबलचा कल्याण हॉस्पिटलमध्ये मृत्यूचे झाल्याच समोर आले आहे. कॉन्स्टेबल सुरेखा उन्वेकर या पहिल्या मुंबई पोलिस दलातील महिला आहे, ज्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


राज्यातील महिलांवरील होणारे अत्याचार आणि मंदिर बंदच्या विरोधात आज आणि उद्या भाजप राज्यभर आंदोलन करणार आहे.


संपूर्ण जगात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा देखील झपाट्याने वाढताना दिसत आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगातील कोरोनाबाधितांचा आकडा ३ कोटी ७७ लाख पार झाला आहे. यापैकी १० लाख ८१ हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला असून २ कोटी ८३ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


रविवारी राज्यात १०,७९२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १५,२८,२२६ झाली आहे. राज्यात रविवारी ३०९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे. राज्यात एकूण २,२१,१७४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून नवीन निदान होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट होत असली तरी मृत्यूच्या आकड्यांनी राज्याची चिंता कायम ठेवली आहे. सविस्तर वाचा