आपलं महानगर इम्पॅक्ट; खासगी डॉक्टर्सनी दवाखाने बंद न ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

Mumbai
private doctor must open clinic
खासगी डॉक्टरांनी दवाखाने सुरु ठेवण्याचे आदेश

खासगी डॉक्टर्सनी आपापले दवाखाने बंद ठेवून नियमित रुग्णांची गैरसोय करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. आपलं महानगरने हा विषय गेल्या दोन दिवसांपासून लावून धरला होता. माय महानगरतर्फे दि. २५ मार्च रोजी फेसबुक लाईव्ह दरम्यान अनेक वाचकांनी ही बाब लक्षात आणून दिली होती. तसेच आज वर्तमान पत्रात देखील आपलं महानगरने ग्राऊंडची परिस्थिती मांडली होती. त्यानंतर आज संध्याकाळी मुख्यमंत्री कार्यालयाकडून हे आदेश देण्यात आले आहेत. तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या वाहनांतून प्रवासी प्रवास करत असल्याचे समोर आले आहे. राज्यांच्या सीमा बंद असून आता इतर राज्यांतील अडकलेल्या नागरिकांची राज्य शासन काळजी घेईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Mymahanagar
आपलं महानगरने आजच्या अंकात ही बातमी दिली होती

मुख्यमंत्री म्हणाले कि, खासगी डॉक्टर्सनी त्यांचे दवाखाने सुरु ठेवणे गरजेचे आहे. कोरोनाव्यतिरिक्त देखील त्यांच्याकडे इतर रोगांच्या उपचारासाठी रुग्ण येतात. त्यात वयोवृद्ध, महिला, मुले असतात त्यांची गैरसोय होऊ नये. लवकरच आपण अत्यावश्यक सेवेतील सर्वाना ओळखपत्र देत आहोत त्यात डॉक्टर, त्यांच्याकडील कर्मचारी सर्वांचा समावेश असेल. आपल्या जिल्ह्यात परदेशांतून गेल्या १५ दिवसांत जर कुणी प्रवास करून आले असेल तर जिल्हाधिकारी यांनी त्यांची माहिती घ्यावी आणि सदरील व्यक्तींची तपासणी करून घेणे महत्वाचे आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व्यवस्थित राहील, औषधी लोकांना मिळतील हे पाहावे. शेतकरी आणि विशेषतः शेतीच्या कामासाठी येजा करणाऱ्यांना अडथळा होणार नाही, हे पाहावे.

कोणत्याही परिस्थितीत इतर राज्यांतून आपल्या राज्यात येऊन थांबलेल्या नागरिकांची इथेच आम्ही काळजी घेऊ, त्यांना लॉक डाऊन पूर्ण होईस्तोवर परत पाठवणे शक्य होणार नाही. महाराष्ट्रातले लोक जर इतर राज्यांत कुठे अडकले असतील तर त्यांचीही त्या त्या राज्यांनी काळजी घ्यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. आज सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी वर्षा येथून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील महत्वपूर्ण सूचना केल्या. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब, मुख्य सचिव अजोय मेहता , पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायस्वाल, पोलीस आयुक्त परम बीर सिंह , मनपा आयुक्त प्रवीण परदेशी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले काही महत्त्वाचे मुद्दे – 

जीवनावश्यक वस्तूंसाठी उपयोगात आणली जाणारी वाहतूक पोलीस अडवणार नाहीत पण कोणत्याही परिस्थितीत अशा वाहनांमधून या कामाशी संबंधित नसलेले लोक प्रवास करताना आढळले तर कारवाई केली जाईल.

प्रत्येक जिल्ह्यात किती रुग्ण क्वारंटाईन करू शकतो तसेच कोरोना साठी किती वॉर्ड किंवा रुग्णालय राखून ठेवू शकतो त्याचे व्यवस्थित नियोजन करून तात्काळ कळवावे.

कोरोना विरुद्धच्या या लढाईत आपण अतिशय नियोजनपूर्व पद्धतीने जात आहोत. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक कामाची योग्य विभागणी करावी, अधिकाऱ्यांना जबाबदारी वाटून द्यावी व मुख्यालयाच्या संपर्कात राहावे असेही मुख्यमंत्री म्हणाले

पोलिसांवर मोठी जबाबदारी आहे, त्यांनी डोके शांत ठेवावे असे सांगून मुख्यमंत्र्यांनी राज्यात किराणा, भाजीपाला घेण्यासाठी काही ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून नागरिकांमध्ये योग्य अंतर ठेवण्याच्या कल्पनांचे मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here