ड्रग्जप्रकरणी सिनेअभिनेता अर्जुन रामपालला एनसीबीचे समन्स

अर्जुनला प्रेयसीसोबत बुधवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश, शबानासह इतर पाच जणांना लोकल कोर्टाकडून न्यायालयीन कोठडी

अभिनेता अर्जुन रामपाल

बॉलिवूडमधील ड्रग्जप्रकरणी आता सिनेअभिनेता अर्जुन रामपाल याला एनसीबीने समन्स बजाविले असून अर्जुनला त्याच्या प्रेयसीसोबत बुधवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. दरम्यान याच गुन्ह्यांत रविवारी अटक करण्यात आलेली निर्माता फिरोज नाडियादवाला याची पत्नी शबाना सईद फिरोज नाडियालवाला हिच्यासह इतर चौघांनाही लोकल कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांच्या जामिनावर लवकरच सुनावणी होणार आहे. न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने शबानाला भायखळा तर इतर चौघांना तळोजा कारागृहात पाठवण्यात आले आहे.

रविवारी एनसीबीच्या अधिकार्‍यांनी सिनेअभिनेता अर्जुन रामपालच्या घरी छापा टाकला होता. या कारवाईत त्याच्या वाहनचालकाला या अधिकार्‍यांनी ताब्यात घेतले, त्याच्याकडून ड्रग्जविषयी काही महत्त्वाची माहिती प्राप्त झाल्याने अर्जुन रामपाल व त्याची प्रेयसी ग्रॅबिएला डेमेटिएड्स या दोघांना बुधवारी 11 नोव्हेंबरला एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले आहे. अर्जुनच्या घरातून या अधिकार्‍यांनी काही इलेक्ट्रॉनिक डिवाइस जप्त केले असून यासंदर्भात त्याची एनसीबीकडून चौकशी होणार आहे.

यापूर्वी ग्रॅबिएलचा भाऊ एगीसलोस डेमेटिएडसला ड्रग्जप्रकरणी या अधिकार्‍यांनी अटक केली होती, नंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती. त्यानंतर त्याला ड्रग्जप्रकरणी पुन्हा या अधिकार्‍यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. शबाना सईदनंतर आता अर्जुन रामपाल हा एनसीबीच्या रडारवर असल्याने बॉलिवूडमध्ये ड्रग्ज संकट काही कमी होताना दिसत नाही. या घटनेने बॉलिवूडमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.