“वर्ल्ड फूड प्रोग्राम”ला शांततेसाठी नोबेल

शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव चर्चेत असताना गेल्या पाच दशकांत जगातील अनेक देशांमध्ये भुकेचा प्रश्न सोडवणारी मोहीम ‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’ला २०२० सालचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.‘डब्ल्यूएफपी’म्हणून ओळखल्या जाणार्‍या या मोहिमेने जागतिक स्तरावरील भुकेचा प्रश्न सोडवणे, युद्धजन्य परिस्थितीत परिस्थिती सुधारण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केला आहे.

वर्ल्ड फूड प्रोग्रामने 2019 मध्ये जवळपास 88 देशांमधील 10 कोटी नागरिकांच्या भुकेचा प्रश्न सोडवण्यासाठी मदत केली आहे. भुकेच्या प्रश्नावर काम करणारी आणि अन्न सुरक्षेला प्रोत्साहन देणारी ही जगातील सर्वात मोठी मानवतावादी संस्था आहे. कोरोना विषाणूच्या साथीरोगाने जगभरात भुकेच्या बळींची संख्या वाढवली आहे. त्या पार्श्वभूमीवर जागतिक अन्न कार्यक्रमाने भूकेचा प्रश्न सोडवण्यासाठी आपले प्रयत्न वाढवण्याविषयी चांगली क्षमता दाखवली आहे, असे गौरवोद्गार नोबेल पुरस्कार समितीने काढले आहेत.

नोबेल पुरस्कार समितीने पुढे म्हटले आहे, जागतिक अन्न कार्यक्रमाने अनेक स्तरावर शांततेसाठी अन्न सुरक्षा हे एक माध्यम वापरण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे. तसेच वर्ल्ड फूड प्रोग्रामने संयुक्त राष्ट्राच्या सदस्य देशांचे युद्धजन्य भागात होणार्‍या भूकेच्या गैरवापराकडे लक्ष वेधले. या संस्थेने अल्फ्रेड नोबेल यांना अभिप्रेत राष्ट्रांमधील बंधुत्वाची भावना वाढीस लागावी म्हणून मोठे योगदान दिले आहे. ही संस्था नोबेल पुरस्काराला अभिप्रेत अशी आधुनिक शांततेचे प्रतिक असून त्यामुळे या कामाला प्रोत्साहन मिळाले आहे.