बत्ती गुल! मुंबई महानगर क्षेत्रातील जनजीवन विस्कळीत

पॉवरग्रीड बंद, वीज पुरवठा खंडित

देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्‍या मुंबईची सोमवारी सकाळी बत्ती गुल झाली आणि एकच खळबळ उडाली. काही तास वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर तो सुरू झाला खरा; पण तीन एक तासात वीज गेल्याने लोकल ट्रेन, कार्यालये, घरून काम करणार्‍या हजारो कर्मचार्‍यांचे कामकाज तसेच व्यवहार ठप्प झाल्याने मुंबई, ठाणे आणि परिसर थांबल्यासारखा झाला. एकूणच धावत्या मुंबईला कोणी तरी हात धरून एका जागी उभे केले… पुढील काही तास हालचाल न करण्यासाठी! विशेष म्हणजे ठाण्यात तर रात्री उशिरापर्यंत काही भागात वीज आली नव्हती. प्रगत समजल्या जाणार्‍या महाराष्ट्राची या प्रकाराने नामुष्की झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने बैठक घेत चौकशीचे आदेश दिले. वीज पुरवठा खंडित झाल्या प्रकरणी काही बेजबाबदार अधिकार्‍यांवरही कारवाई करण्याचा इशारा दिला आणि असा प्रकार पुन्हा घडू नये याचीही काळजी घेण्याच्या सूचनाही दिल्या. वीज गेल्याने मुंबई परिसरातील बर्‍याच भागात पाणी पुरवठा बंद झाला. शेवटी नागरिकांनी पाणी जपून व काळजीपूर्वक वापरावे, असे आवाहन करण्याची वेळ मुंबई महापालिकेवर आली.

मुंबईची लोकल, पाणी सुविधा, हॉस्पिटल आणि शैक्षणिक अशा अनेक सुविधांना ठप्प करणारा असा विजेचा मोठा धक्का सोमवारी मुंबईकरांना बसला. या तांत्रिक बिघाडाचा परिणाम दिवसभर विविध प्रकारे जाणवत राहिला. आधीच ऑक्टोबर हिटमुळे हैराण झालेल्या मुंबईकरांचे काही तास वीज खंडित झाल्यामुळे खूपच हाल झाले. अशा प्रकारे पॉवरग्रीडमध्ये जम्बो बिघाड होण्याचा अनुभव मुंबईकरांनी सुमारे दहा वर्षांनंतर घेतला. या बिघाडामुळे मुंबईसह संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रातील वीज गायब झाली होती. यापूर्वी २०१० साली अशाप्रकारे वीज खंडित होण्याची घटना घडली होती.

नेमके काय घडले ?

महापारेषणच्या ४०० के. व्ही. कळवा-पडघा भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) केंद्रात सर्किट-१ ची देखभाल दुरूस्ती सुरू होती. यावेळी सर्व भार सर्किट-२ वर होता. मात्र, सर्किट-२ मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यातील काही भागात वीजपुरवठा खंडित झाला. दरम्यान, महापारेषणच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी युध्दपातळीवर काम करून काही भागात वीजपुरवठा पूर्ववत केला.

काय होता तांत्रिक बिघाड ?

सोमवारी सकाळी १० वाजून १० मिनिटांनी मुंबईला वीजपुरवठा करणार्‍या कळवा, पडघा, खारघर ट्रान्सफॉर्मर वाहिनी बंद झाल्या. मुंबई व मुंबई उपनगरचा २२०० मेगावॅट वीजपुरवठा खंडित झाला. उरण वायू विद्युत केंद्रातील सर्व संच एससी बिघाड झाल्याने बंद झाला. खारघर-तळोजा वाहिनी बंद झाली. दरम्यान, महापारेषणच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी तातडीने ती वाहिनी पूर्ववत केली. दरम्यान, कळवा-खारघर येथील जंपर ब्रेकडाऊन झाला, हा वीज पुरवठा दुपारी अडीच वाजता सुरू करण्यात आला. त्याआधी ४०० के. व्ही. कळवा-तळेगाव पॉवरग्रीड वाहिनी १० ऑक्टोबरला दुपारी १ वाजून ४७ मिनिटाला बाधित झाली होती. ४०० के. व्ही. पडघा-कळवा वाहिनी-१ ही १२ ऑक्टोबरला पहाटे ४ वाजून ३३ मिनिटाला ओव्हर व्होल्टेजमुळे बंद झाली. इन्सुलेटर बदलण्यासाठी सदर वाहिनी बंद ठेवण्यात आली. ४०० के. व्ही. पडघा-कळवा वाहिनी-२ सकाळी १० वाजून १ मिनिटांनी डिस्टन्स प्रोटेक्शन बिघाड झाल्याने बंद झाली. मनोरा लोकेशन क्रमांक-१००७ येथे वाहिनी तुटून पडली होती. मोठ्या प्रमाणात ठिणग्या आढळून आल्याने ४०० के. व्ही. तळेगाव पॉवरग्रीड- वाहिनी खारघर येथून सकाळी १० वाजून २ मिनिटांनी बंद करण्यात आली. यामुळे कळवा व खारघर येथील ४०० के. व्ही. च्या दोन्ही बस शून्य भारीत (Zero Load) झाल्या. ज्यामुळे मे. टाटाकडून संच क्र. ५ (५०० मेगावॉट) चा वीजपुरवठा बंद झाला. तसेच बोईसर पॉवरग्रीड ची २२० के. व्ही. पुरवठा वाहिनी क्र. ३ सुध्दा सकाळी १० वाजून ५ मिनिटांनी बंद झाली. त्यामुळे मे. टाटा यांचा सुमारे ५७० मेगावॅट व मे. बेस्ट यांचा ४४० मेगावॅट बंद झाला. यामुळे मे. अदानी यांच्या परीक्षेत्रातील ७०० मेगावॉट वीजभार बंद झाला. वीजपुरवठा सुरळीत करण्याचे कामसुध्दा युध्दपातळीवर सुरू आहे. ट्रॉम्बे बस ऊर्जित केली असून वीज निर्मिती सुरू करण्यात येत आहे.

कुठे कशी वीजसेवा झाली पूर्ववत ?

आम्ही मुंबई आयलँड सिस्टिम कार्यरत करण्यात यशस्वी झालो. आम्हाला आणखी विजेची गरज होती, पण त्यासाठी आम्ही ग्रीडवरच अवलंबून होतो. अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडच्या उपनगरातील बहुतांश भागात आम्ही वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असे (अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड) एईएमएलने स्पष्ट केले. तर मुंबईतील ९० टक्के भागात वीज पुरवठा सुरळीत झाला आहे, अशी माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली. तर टाटा पॉवरने दिलेल्या माहितीमध्ये ३ हायड्रो स्टेशनच्या माध्यमातून वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे असे सांगण्यात आले. मुंबई वीज प्रणाली सुरू करण्याचे प्रयत्न युध्दपातळीवर करण्यात येत आहेत. आतापर्यंत सुमारे ७० टक्के वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने रेल्वे व रूग्णालयांचा वीजपुरवठा प्राधान्याने सुरू करण्यात आला आहे.

मुंबईच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम

महापारेषणच्या कळवा पडघा येथील जीआयएसच्या बिघाड झाल्याने याचा परिणाम मुंबईतील पाणी पुरवठ्यावर झाला आहे. यामुळे अनेक भागात सकाळी पाणी पुरवठा होऊ शकला नाही, तसेच जलशुद्धीकरण केंद्रात तसेच पुरवठ्यात या विद्युत बिघाडामुळे अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर मंगळवारी दिसून येणार आहे. त्यामुळे तलाव भरले असले तरी मुंबईकरांना कमी पाण्यात भागवावे लागणार आहे.

मोबाईल सेवा विस्कळीत
मुंबईतील सर्व मोबाईल सेवा पुरवठादार कंपन्यांच्या सेवा सोमवारच्या पॉवर शटडाऊन दरम्यान विस्कळीत झाल्या. त्यामुळे मोबाईल ग्राहकांना इंटरनेट सुविधा वापरता येत नव्हती. तसेच मोबाईल कॉल ऑपरेट करणे शक्य होत नव्हते. व्हॉट्सअ‍ॅपसारख्या मॅसेंजर अ‍ॅपवरही याचा परिणाम झाला.

अडीच तास लोकल ठप्प
मुंबईत अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने तिन्ही मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाल्या होत्या. पण तब्बल अडीच तासानंतर मुंबईतील विविध भागातील वीज पुरवठा सुरळीत झाल्या आहेत. त्यामुळे तिन्ही मार्गावरील लोकल सेवा पूर्ववत झाल्या आहेत.

दहा वर्षांनंतर ग्रीड कोसळले
आयआयटी मुंबईचे प्राध्यापक एस. ए. खापर्डे यांच्या अध्यक्षतेत नोव्हेंबर २०१० मध्ये झालेल्या पॉवरग्रीड बंद पडण्याची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. याआधी १८ नोव्हेंबर आणि २१ नोव्हेंबर २०१० साली दोनवेळा ग्रीड बंद होण्याची घटना घडली होती. या घटनेची दखल घेऊनच राज्य वीज नियामक आयोगाने चार सदस्यीय समिती नेमली होती. या समिती एक अहवाल सादर केला होता. त्यामध्ये मुंबईचे पारेषण वाहिनीचे नेटवर्क सक्षम करण्यासाठी वेगवेगळी पावले उचलावीत, असे सुचवण्यात आले होते. तसेच विक्रोळी ४०० केव्ही सबस्टेशनची निर्मिती करून मुंबईत अधिक वीज आणण्यासाठीचे पर्याय आणावेत, असे स्पष्ट करण्यात आले होते.

पाणीही झाले गायब

महापारेषणच्या कळवा पडघा येथील जीआयएसच्या यंत्रणेत बिघाड झाल्याने याचा परिणाम मुंबईतील पाणी पुरवठ्यावर झाला आहे. यामुळे अनेक भागांत सकाळी पाणी पुरवठा होऊ शकला नाही. तसेच लोअर परळ, विलेपार्ले, भायखळा, काळाचौकी, वरळी या भागात दुपारी आणि संध्याकाळीही पाणी पुरवठा झाला नाही. तसेच जलशुद्धीकरण केंद्रात तसेच पुरवठ्यात या विद्युत बिघाडामुळे अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर मंगळवारी दिसून येणार आहे. त्यामुळे तलाव भरले असले तरी मुंबईकरांच्या भांड्यांमध्यश कमी पाणी जमा होणार आहे.

मुंबईला मोडक सागर, अप्पर वैतरणा, भातसा, मध्य वैतरणा, तानसा, तुळसी आणि विहार धरणातून पाणी पुरवठा केला जातो. या धरणातील पाण्यावर पिसे-पांजरापोळ आणि भांडुप कॉम्प्लेक्स या ठिकाणी जलशुद्धीकरण केले जाते. परंतु मुंबईसह संपूर्ण महानगर भागात सोमवारी सकाळी वीज पुरवठा खंडित झाल्याने धरणातून जलशुद्धीकरण केंद्रात आणि जलशुद्धीकरण केंद्रातून मुंबईला यामुळे पाणी पुरवठा करण्यात अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे सकाळच्या वेळेत मुंबईतील ज्या भागात पाणी पुरवठा केला जातो त्याचा या विद्युत बिघाडामुळे पुरवठा खंडित झाला आहे. तसेच या बिघाडामुळे धरणातील पाणी उचलून जलशुद्धीकरण केंद्रात आणण्यात अडचणी आल्याने याचा परिणाम सोमवारी रात्री होणार्‍या पाणी पुरवठ्यावर आणि मंगळवारी सकाळी होणार्‍या पाणी पुरवठ्यावर होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे महापालिकेच्या जल विभागाच्या अधिकार्‍यांनी पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन केले आहे.