घरताज्या घडामोडीपंजाब-हरियाणातील शेतकरी आंदोलनाचा महाराष्ट्रातील धान्य पुरवठ्यावर परिणाम

पंजाब-हरियाणातील शेतकरी आंदोलनाचा महाराष्ट्रातील धान्य पुरवठ्यावर परिणाम

Subscribe

आंध्र प्रदेश आणि तामीळनाडू मदतीला धावले

पंजाब आणि हरियाणा या राज्यातील शेतकर्‍यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे राज्यात शिधापत्रिकेवरील अन्नधान्याची आवक पुरती रोखली गेल्याचा गंभीर परिणाम राज्यातल्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाला सोसावा लागतो आहे. यावर तातडीचा उपाय म्हणून आंध्र प्रदेश आणि तामीळनाडू या राज्यांची मदत घेण्याचा निर्णय या विभागाने घेतला असून, या राज्यांनीही महाराष्ट्राला मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. या दोन राज्यांकडून महाराष्ट्राला तांदूळ आणि गव्हाचा तातडीने पुरवठा करण्यात येणार असल्याचे राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ‘महानगर’शी बोलताना सांगितले.

केंद्राने लागू केलेल्या कृषी कायद्याच्या निषेधार्थ देशभर शेतकर्‍यांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. भाजपेतर राज्य सरकारांनी या कायद्याचा आपल्या राज्यात अंमल करायचा नाही, असा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर पंजाब आणि हरियाणातील शेतकर्‍यांनी त्या राज्यांमध्ये तीव्र आंदोलन पुकारले आहे. केंद्राच्या कायद्याला विरोध करण्यासाठी या दोन्ही राज्यातील शेतकर्‍यांनी आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे. पंजाबमध्ये या आंदोलनाचा विशेष प्रभाव जाणवू लागला आहे. या राज्यांतून जाणारे रेल्वेचे सगळे मार्ग तिथल्या शेतकर्‍यांनी पूर्णत: रोखले असून, यामुळे या दोन्ही राज्यांसह जम्मू-काश्मीरमधून येणार्‍या मालाची आवक रोखली गेली आहे. शेतकर्‍यांनी रेल्वे मार्गावरच बसकण मारल्याने मालाची वाहतूक पूर्णत: थांबली आहे.

- Advertisement -

या दोन्ही राज्यांमधून महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात गहू आणि तांदळाचा पुरवठा केला जातो. शेतकर्‍यांच्या आंदोलनामुळे हे धान्य महाराष्ट्रात येणे थांबले आहे. परिणामी रास्त भाव धान्याच्या दुकानातील धान्याचा तुटवडा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही अडचण दूर करण्यासाठी राज्य सरकारने आंध्र प्रदेश आणि तामीळनाडू या राज्यांकडे धान्याच्या पुरवठ्याची विनंती केली होती. ही विनंती या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आहे. सध्या महाराष्ट्रात भारतीय अन्न महामंडळाकडे ५ लाख टन तांदूळ आणि ११ लाख टन गव्हाची साठवणूक करण्यात आली आहे. हा साठा आगामी चार महिन्यांसाठी पुरवणे शक्य आहे. मात्र, आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन ते किती काळ चालेल याची खात्री देता येत नसल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आंध्र आणि तामीळनाडू या राज्यांकडून धान्याची आवक केली जात असल्याचे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

पूरग्रस्तांना मोफत धान्य
राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात झालेल्या अतिवृष्टीने या विभागात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पूरपरिस्थितीमुळे निराधार झालेल्या कुटुंबांना तातडीने धान्य पुरवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या कुटुंबांना १० किलो तांदूळ, १० किलो गहू आणि ५ लिटर रॉकेल मोफत देण्याचे आदेश सरकारने काढले आहेत. त्यानुसार हा पुरवठा तातडीने केला जात असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Pravin Puro
Pravin Purohttps://www.mymahanagar.com/author/ppravin/
विविध वृत्तपत्रांमध्ये ३२ वर्ष पत्रकारिता. वृत्तपत्र आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, राज्य आणि राष्ट्रीय विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -