रानफुलांनी बहरला किल्ले रायगड

‘वाहती निर्झर मंदगती, डोलती लतिका वृक्षतती, पक्षी मनोहर कुंजीत रे, कोणाला गातात बरे? कमल विकसले, भ्रमर गुंगले, डोलत वदले, इकडे, तिकडे, चोहीकडे, आनंदी आनंद गडे’… ऐतिहासिक रायगड किल्ल्यावर उगवलेल्या रानफुलांनी आणि वार्‍यावर डोलणार्‍या गवताच्या पात्यांकडे पाहताना बालकवींच्या या कवितेची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. सोनकीच्या पिवळ्या जर्द फुलांनी तर गडाला जणू सोन्याचा साजच चढविल्याचा भास होत असतो.

ऐन पावसाळ्यात किल्ल्यावर अनेक रानफुलांचा बहर येतो. पावसाळ्यातील तेथील निसर्गाचे चित्र डोळ्यात साठविण्यासारखे असते. दाट धुक्यासह पाण्याचा खळखळाट शांत वातावरणात डोळ्यांसह कानाला मोहवून टाकतो. त्याबरोबर गडावर उगवलेले हिरवेगार गवत आणि त्यामधून उमललेले रानफुलांचे ताटवे मंद वार्‍याच्या झुळकेबरोबर डोलतानाचे दृश्य पाहतच राहावे असे असते. किल्ल्याच्या पायथ्यापासूनच पाऊलवाटेच्या दोन्ही बाजूला विविध रानफुले आता पहावयास मिळत आहेत. राज दरबार परिसर, बाजारपेठ, टकमक टोक, श्री जगदिश्वर मंदिर आदी ठिकाणी सोनकीसह तेरडा, कुत्रीचे फुल, भेंड आणि इतर अनेक रानटी गवती फुले पाहावयास मिळतात. या रानफुलांनी मृत्यूची दाढ म्हणून ओळखला जाणारे टकमक टोक देखील नयनरम्य वाटत आहे.

जागोजागी बहरलेली सोनकीची फुले अणि आकर्षक फुले असलेल्या तेरड्याची रोपटी उगवल्याने हिरव्यागार गवतावर फुलांचा गालीचा पसरल्यासारखे पाहून तेथे येणार्‍योचे मन कमालीचे प्रफुल्लीत होऊन जाते. पहाटे दाटणारे धुके, मंद वारा, पाण्याचा खळखळाट जणू पृथ्वीवर स्वर्गच अवतरल्यासारखे जाणवते किंबहुना तशी प्रत्येकाची भावना आहे. चहूबाजूला दिसणारी रानफुले डोळ्यांचे पारणे फेडत आहेत.

ऑगस्ट ते ऑक्टोबरपर्यंतच असे वातावरण अनुभवयास मिळते. त्यानंतर मात्र धुके निर्माण होऊन रानफुलांचा बहर हळूहळू संपतो. बहुतांश जागी आढळणारी सोनकी आणि सोनटिकली या फुलांचा बहर प्रतिवर्षी दिसून येतो. जवळपास सर्वच ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा ही फुले दिसतात. या दोन्ही जाती तिळाच्या फुलांसारख्या आहेत. किल्ल्यावर रानभेंडी देखील मोठ्या प्रमाणात आढळून येतात. मात्र, दुर्मिळ अशी हिरवी निसुरडी, सीतेची आसवे, पंद, रानतीळ, कुडा, अग्निशिखा आणि आभाळी ही रानफुलेसुद्धा आढळून येत आहेत. पावसाळा सरत असताना ही रानफुले किल्ल्याच्या सौंदर्यात अधिकच भर घालत आहेत.