मराठा समाजाची अवस्था कपाळावर कुंकू असून विधवेसारखी

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांची प्रतिक्रिया

सगळी सत्व परीक्षा मराठा समाजानेच द्यावी, अशी भूमिका काही विचारवंतांनी घेतली असून हे चुकीचे आहे. प्रत्येक वेळी मराठा समाज समन्वयाची भूमिका घेणार नाही. आधीच मराठा समाजाची अवस्था ‘कपाळावर कुंकू असूनही विधवेसारखी झाली आहे,’ अशी उद्विग्न प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी व्यक्त केली आहे.

येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले. एमपीएससीमध्ये यशस्वी होणारे तरुण केवळ एक टक्का आहेत. खासगी क्षेत्रात तरुणांना संधी मिळावी यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत. बंद असलेली सारथी संस्था पुन्हा मजबूत करावी, अशीही मागणी यावेळी कोंढरे यांनी केली.

राज्य शासनाने एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा जो निर्णय घेतला त्याचे आम्ही स्वागत करतो. या परीक्षेसाठी 2 लाख 60 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत, असेही त्यांनी सांगितले. मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा एवढेच ध्येय न बाळगता अनेक क्षेत्रातील संधींकडे लक्ष द्यावे, असेही आवाहन त्यांनी केले. मराठा समाजातील गर्भश्रीमंत व उच्च मध्यमवर्गीयांनी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याची भूमिका स्वीकारली पाहिजे. अन्यथा भविष्यात रोजगार नसलेली पिढी हातात दगड घेऊन व्यवस्थेच्या विरोधात उभी राहील, याकडे कोंढरे यांनी लक्ष वेधले.

प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती घराण्याबाबत आदर ठेवायला हवा. आदर ठेवण्यात प्रकाश आंबेडकर कमी पडत असल्याचे दिसत आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी उदयनराजे आणि संभाजीराजेंवर केलेल्या टीकेवर कोंढरे यांनी मत मांडले. सारथी या संस्थेचे उपकेंद्र कोल्हापूरला झाले पाहिजे. याशिवाय आरक्षणाची चोरी होतेय हे उघड वास्तव आहे. मात्र, राजकारणामुळे हे दाबले जाते. याचा परिणाम होऊन मराठा समाज भरडला जातो आहे, असे ते म्हणाले.