बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी रिया चक्रवर्तीला जामीन मंजूर

रिया चक्रवर्ती

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीदरम्यान समोर आलेल्या बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अटक करण्यात आलेल्या रिया चक्रवर्तीला मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. प्रत्यक्ष ड्रग्स सिंडीकेटमध्ये नसल्यामुळे रियाला एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. परंतु, एनसीबीकडे पासपोर्ट जमा करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. तसेच सुटकेनंतर दहा दिवस जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावावी आणि कोर्टाच्या परवानगीशिवाय देशाबाहेर जाऊ नये, असे आदेश हायकोर्टाने रियाला दिले आहेत.

रियाला जामीन मिळाला असला तरी तिचा भाऊ शौविकचा जामीन अर्ज मात्र कोर्टाने फेटाळून लावला आहे. तसेच या प्रकरणात शौविक चक्रवर्ती, अब्दुल बासित परिहार यांचाच अर्ज फेटाळला आहे. तसेच रियासह मिरांडा आणि दीपेश सावंतचा जामीन मंजूर झाला आहे. रिया चक्रवर्तीसह सर्व आरोपींच्या जामीन अर्जावर कोर्टाची प्रक्रिया सकाळी 11 वाजता सुरु झाली होती. त्यानंतर कोर्टाने लगेचच रियाचा जामीन अर्ज मंजूर केला.

न्यायाधीश सारंग वी. कोतवाल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमार्फत आपला निर्णय सुनावला. याआधी 29 सप्टेंबर रोजी या प्रकरणाच्या सुनावणीनंतर कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला होता. तसेच मंगळवारी एनडीपीएल कोर्टाने रिया, शौविक, सॅम्युअल, दीपेश, बासित परिहार आणि जैद यांच्या 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी 20 ऑक्टोबरपर्यंत वाढवली होती.

रिया ड्रग्स सिंडिकेचा हिस्सा नाही
रिया ड्रग्स डीलर सिंडिकेटचा हिस्सा नसल्याचे म्हटले गेले आहे. रियाला सर्वात प्रथम कोर्टासमोर हजर करण्यात आले तेव्हा एनसीबीने तिचा ताबा मागितला नव्हता. याचाच अर्थ एनसीबी तिच्या चौकशीबाबत समाधानी होती. तिने एनसीबीला चौकशी दरम्यान सहकार्य केले होते. सुशांत सिंह राजपूत हा स्वत:च्या घरात राहत होता आणि स्वत:च्या गरजांसाठी खर्च करत होता. त्याच्या विरोधात कोणताही गुन्हा दाखल नव्हता. त्यामुळे रिया चक्रवर्तीने त्याला आश्रय दिला आणि अमली पदार्थ मिळवण्यासाठी पैशांचा पुरवठा केला, असे म्हणता येणार नाही, असे न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी रियाच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना नमूद केले.