मुंबईप्रमाणेच ठाण्यातही शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंदच!

प्रातिनिधीक छायाचित्र

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबई महानगर पालिकेने शुक्रवारी दुपारी मुंबईतील सर्व शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यापाठोपाठ आता ठाणे जिल्ह्यातल्या सर्व शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना निर्देश दिले आहेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील ९वी ते १२वीचे वर्ग सुरू करण्याची परवानगी दिली असतानाच स्थानिक परिस्थितीनुसार स्थानिक प्रशासनाने निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार मुंबई महानगर पालिकेने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आता मुंबई आणि ठाण्यातल्या शाळा थेट पुढच्या वर्षीच उघडणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे.