शाहू महाराजांनी बहुजनांना आरक्षण दिले

आज त्यांचा समाजच वंचित

MP_Sambhaji
संभाजीराजे छत्रपतींची टीका

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर होत असलेल्या महत्त्वाच्या बैठकीत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुन्हा एकदा एल्गार केला आहे. यावेळी त्यांनी शाहू महाराजांनी जे आरक्षण बहुजनांना बहाल केले त्यात आता मराठा समाजच वंचित राहिल्याची खंत व्यक्त केली. या मराठा समाजाकडे कोण लक्ष देणार असाही सवाल संभाजीराजे यांनी विचारला आहे.

संभाजीराजे छत्रपती म्हणाले, बहुजनांसाठी शाहू महाराजांनी जे आरक्षण बहाल केले होते त्यात मराठा समाजच वंचित राहिला आहे. मग या मराठा समाजाकडे लक्ष कोण देणार? अण्णासाहेब पाटलांपासून जो पहिला लढा झाला त्याला आम्ही सलाम करतो. पण 2007 पासून मी बाहेर पडलो ते 2013-14 ला याच माथाडी कामगार भवनमध्ये माझी नरेंद्र पाटील यांच्यासोबत भेट झाली. नरेंद्र पाटलांनी ठरवले की राजे तुम्ही नेतृत्व करा, आम्ही सर्व एकत्र येतो. त्यावेळी देखील मी त्यांना हाच शब्द दिला होता की मी नेतृत्व करणार नाही.

खांद्याला खांदा लावून मी मराठा समाजासोबत राहीन, असे मी सांगितले होते. आता ती वेळ पुन्हा आली आहे. सर्व मराठा संघटना एकत्र आल्या आणि येथूनच आझाद मैदानावर महामोर्चा गेला. त्यावेळी तो लढा यशस्वी झाला. त्यावेळी नारायण राणे समिती होती आणि त्यानंतरच आपल्याला ईएसबीसी आरक्षण मिळाले, असेही संभाजीराजे छत्रपती यांनी नमूद केले.

संभाजीराजे म्हणाले, मराठा समाजाने आपल्या भावना व्यक्त केल्या. सर्व समन्वयक, सहकारी आणि ज्यांनी पुढाकार घेतला, अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव यांचे आभार मानतो. शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केले ते सर्व 18 पगड जातीचे होते. आज जातीय विषमता कमी व्हायला हवी; पण ती वाढतेय. मी सर्व समाजाचा आहे, पण आज मराठा समाज बाहेर फेकला गेला आहे.

शिवाजी महाराज, शाहू महाराज यांनी बहुजन समाजासाठी सारे काही केले. आज ते वंचित नाहीत, मात्र मराठा समाज वंचित आहे. मी नरेंद्र पाटलांना भेटलो, त्यांनी मला नेतृत्व करण्याची विनंती केली; पण मी नेतृत्व करणार नाही, तर मराठ्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत लढणार आहे, असे संभाजीराजेंनी सांगितले.