शिवसेनेच्या पर्यायी उमेदवारांमुळे पुणे मतदारसंघात राष्ट्रवादी संकटात

राज्य विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत शिवसेनेच्यावतीने निवडून येऊ शकतात अशा पाच उमेदवारांची यादी मातोश्रीवर पाठविल्याने महाविकासआघाडीतल्या घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. या नावांमध्ये शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह पुण्याचे जिल्हा परिषद सदस्य अरुण गिरे यांचेही नाव मातोश्रीवर पाठवण्यात आले आहे या नावामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवाराला दगाफटका होण्याची शक्यता लक्षात घेऊन या पक्षाचे नेते नाराज झालेले दिसतात.

पुणे पदवीधर मतदारसंघात आघाडीच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी अर्ज भरायचा, असे निश्चित होऊनही शिवसेनेच्या वतीने नावे पाठवण्यात आली आहेत. दुसरीकडे काँग्रेसनेही उमेदवारांची चाचपणी सुरू केली असल्याने महाआघाडीतला विसंवाद वाढतो की काय असे दिसू लागले आहे. हे दोन्ही मतदारसंघ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपसात वाटून घेतल्याने आपल्या वाट्याला काय आहे, अशी विचारणा शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांकडून होत होती. यासाठी पुणे जिल्हा शिवसेनेने आठ तारखेला बैठक घेऊन आपल्या उमेदवारांची नावे निश्चित केली आणि ती मातोश्री’वर पाठवून दिली.

राज्य सरकार तीन घटक पक्षांच्या महाविकास आघाडीचे असले तरी पुण्यात शिवसेनेचे राष्ट्रवादीबरोबर फारसे जमत नाही. यामुळेच राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या समोर पर्याय द्यायचा. असे ठरवत जिल्हा शिवसेनेने आपल्या उमेदवारांची यादी पाठवून दिली आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा शिवसेनेच्या बैठकीमध्ये जिल्हाप्रमुख माऊली कटके यांनी ‘आम्हाला फार काळ गृहीत धरू नका’, असा जणू इशारा दिला आहे. यामुळे या निवडणुकीत महाआघाडीचे काय होईल हे आतातरी सांगणे अवघड बनले आहे.