ऐन दिवाळीत काळोखाची भीती,वीज कर्मचार्‍यांनी पुकारला संप

Electricity

सानुग्रह अनुदान आणि वेतनवाढीचा दुसरा हप्ता मिळावा यासाठी आक्रमक होत वीज कर्मचार्‍यांनी ऐन दिवाळीत संपाची हाक दिली आहे. उर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासोबत 25 कामगार संघटनांची ऑनलाईन झालेल्या बैठकीतील चर्चा फिस्कटली. त्यामुळे ऐन दिवाळी राज्य अंधारात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महानिर्मिती, महापारेषन आणि महावितरण या तिन्ही कंपन्यांमधील कर्मचार्‍यांच्या 25 संघटनांनी दिवाळीच्या दिवशी संपाचा हाक दिली. सानुग्रह अनुदान आणि पगारवाढीचा दुसरा हप्ता देण्याच्या कर्मचार्‍यांच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी उर्जामंत्री नितीन राऊत यांनी शुक्रवारी संघटनांसोबत ऑनलाईन चर्चा केली. मात्र ही चर्चा फिस्कटल्याने 14 नोव्हेंबरपासून संपावर जाणार असल्याची माहिती वीज कामगार महासंघाचे महामंत्री शंकरराव पहाडे यांनी दिली. दिवाळीच्या दिवशी वीज कर्मचार्‍यांनी संपाची हाक दिली असली तरी संघटनांशी झालेल्या चर्चेनंतर संप होणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला. सरकारला वीज कंपन्यांच्या कर्मचार्‍यांच्या अडचणीची जाणीव आहे. मात्र, सध्या त्यांच्या मागण्या पूर्ण करता येणार नाही, असे मत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केले.

वीज कर्मचार्‍यांच्या काही संघटनांसोबत चर्चा झाली असून ते संपाचा हत्यार उगारणार नसल्याचा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. सरकारला कर्मचार्‍यांच्या अडचणींची जाणीव असून सरकार त्याचा गांभीर्याने विचार करेल, अशी हमी त्यांनी दिली. संपामुळे दिवाळीत काळोख होईल ही भीती अनाठायी असून दिवाळीच्या दिवशी 24 तास वीज पुरवठा केला जाईल, असे राऊत यांनी स्पष्ट केले. दरम्यान, वीज बिलात सवलतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर प्रलंबित आहे, त्यामुळे त्यावर बाहेर भाष्य करता येणार नाही असे ते म्हणाले.