मोक्ष प्राप्तीसाठी ‘त्या’ तिघांची आत्महत्या

शहापूर तालुक्यातील जिवलग मित्रांच्या आत्महत्या ही तिघांनी ‘मोक्ष’ मिळवण्यासाठी केली असल्याची जोरदार चर्चा शहापूर तालुक्यात सुरू आहे. या तिघांनी अमावस्येच्या दिवशीच एकाच साडीने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. मात्र, पोलिसांना याबाबत कुठलेही ठोस पुरावे अद्याप मिळालेले नाहीत. याबाबत पोलीस अधिक तपास करीत असल्याची माहिती शहापूर तालुका विभागाचे पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना दिली.

शहापूर तालुक्यातील चांदा गावात राहणारे नितीन बेहरे (३०) , मुकेश घावटे (२८) आणि महेंद्र दुबले (३१) या तीन जिवलग मित्रांनी गावाच्या बाहेर असणार्‍या एका झाडाला साडी बांधून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली होती. या तिघांच्या आत्महत्येने शहापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. शहापूर पोलिसांना या तिघांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आले होते आणि घटनास्थळी दोन देशी दारूच्या बाटल्या आणि तिघांच्या खिशात मोबाईल फोन मिळाले होते. हे तिघे मित्र १४ नोव्हेंबरपासून बेपत्ता झाले होते. अखेर १७ नोव्हेंबर रोजी त्यांच्या कुटुंबियांनी शहापूर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती.

नितीन बेहरे हा तांत्रिक विद्येच्या आहारी गेला होता. रात्री बेरात्री हे तिघे स्मशानात जाऊन अघोरी विधी करताना अनेकांनी त्यांना पाहिले होते, अशी चर्चा चांदा गावात सुरू आहे. तांत्रिक विद्येने पैशाचा पाऊस पाडून रातोरात श्रीमंत बनण्याचे त्या तिघांचे स्वप्न होते. या स्वप्नाच्या पाठलागासाठी ते सतत बेचैन असत. या जन्मात आपले स्वप्न पूर्ण होत नसल्यामुळे या जन्मात मोक्ष प्राप्ती घ्यायची आणि ते स्वप्न पुढच्या जन्मात पूर्ण करायचे, असा विचार करून त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी चर्चा शहापूरमध्ये सुरु आहे. परंतु पोलिसांना याबाबत कुठलेही ठोस पुरावे अद्याप मिळालेले नाहीत, याकडे पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांनी लक्ष वेधले आहे.

श्रीमंतीचे आकर्षण आणि मुक्तीचे उद्दिष्ट्य
या घटनेचा दोन पातळीवर विचार करता येईल. एक म्हणजे मुक्त अर्थव्यवस्था झाल्यानंतर जगभर आर्थिक सुबत्तेचा एक आभास तयार करण्यात आला. यासाठी जाहिरातींच्या माध्यमातून सतत लोकांवर प्रभाव पाडला जात आहे. हा प्रभाव इतका मायावी आहे की जो तो कुठल्याही मार्गाने श्रीमंतीच्या रस्त्यावर जाऊ पाहत आहे. यासाठी प्रसंगी काही करायला तो तयार दिसतो. हा एक भाग झाला आणि दुसरा भाग धार्मिकतेचा. मग तो कुठलाही धर्म असो. पाप, पुण्य, पूर्वजन्म, स्वर्ग नरक अशा परंपरेच्या ओझ्याखाली माणूस कितीही शिकला सवरला तरी अंधश्रध्देत वावरत असतो. यातून मग मुक्ती हे धार्मिकतेचे अंतिम उद्दिष्ट्य मानले गेले असल्याने माणूस जिवंतपणी मुक्तीच्या स्वप्नात रंगतो.
– अविनाश पाटील. कार्यवाह, महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समिती