शिवसेनेचे बिस्कीट गेले वादक मावळा मिळाले

बिहार निवडणुकीत चिन्ह बदल

vidhan sabha election 2019 activists rent rate politics

पुढील महिन्यात होणार्‍या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेला बिस्कीट हे चिन्ह दिले होते. मात्र, हे चिन्ह बदलून देण्याची लेखी मागणी बिहारमधील शिवसेनेकडून आयोगास करण्यात आली होती. त्यानंतर अखेर निवडणूक आयोगाने शिवसेनेची मागणी मान्य करत शिवसेनेला तुतारी वाजवणारा मावळा हे चिन्ह दिले आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेला बिस्किटाऐवजी तुतारी वाजवणारा मावळा हे निवडणूक चिन्ह बदलून दिल्याचे सोमवारी कळवले. यानंतर निवडणूक आयोगाने बदलून दिलेल्या या नव्या चिन्हाला शिवसेनेची पसंती असल्याचे सांगण्यात येत आहे.

तत्पूर्वी, ट्रॅक्टर चालविणारा शेतकरी, गॅस सिलिंडर वा बॅट यापैकी एका चिन्हाची मागणी शिवसेनेने आयोगाकडे केली होती. बिहार निवडणुकीत ही तिन्ही चिन्हे खुली आहेत. मात्र, आयोगाने शिवसेनेला बिस्कीट चिन्ह दिले. बिहारमध्ये सत्तारुढ संयुक्त जनता दलाचे निवडणूक चिन्ह धनुष्य आहे. त्यामुळे ते चिन्ह देता येणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले होते. बिहार निवडणुकीत शिवसेना ५० जागा लढण्याच्या तयारीत आहे.

शिवसेना बिहारमध्ये ४० ते ५० जागा लढवेल. मात्र, अद्याप तरी युतीबद्दल कोणाशीही चर्चा झालेली नाही. मी पुढील आठवड्यात पाटण्याला जाणार आहे. तेव्हा तिथल्या स्थानिक नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले. भाजपला रोखण्यासाठी शिवसेना प्रयत्न करते आहे का, असा सवाल त्यांना विचारण्यात आला. त्यावर बिहारमध्ये भाजपाला रोखण्याइतकी ताकद आमच्यात नाही, अशी प्रांजळ कबुलीही संजय राऊत यांनी दिली.

बिहारमध्ये उमेदवार निश्चित करण्याची जबाबदारी खा.अनिल देसाई, खा.प्रियांका चतुर्वेदींवर आहे, असे सूत्रांनी सांगितले. २०१५ च्या निवडणुकीत सेनेने ८० जागा लढविल्या. एकही जागा जिंकली नव्हती. सेनेच्या सर्व उमेदवारांना मिळून २,११,१३१ मते मिळाली होती. पक्षाचे सात उमेदवार तिसर्‍या क्रमांकावर होते. बिहार विधानसभा निवडणुकीत यंदा भाजपा प्रभारी म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे बिहारच्या रणांगणात दोन मराठी नेते परस्परविरोधी आक्रमक होणार का? हे आगामी काळात कळेल.