घरताज्या घडामोडीरेल्वे स्थानकाच्या निर्मितीसाठी ठाण्यातील मनोरुग्णालयाचे भवितव्य वाऱ्यावर

रेल्वे स्थानकाच्या निर्मितीसाठी ठाण्यातील मनोरुग्णालयाचे भवितव्य वाऱ्यावर

Subscribe

महाविकास आघाडी सरकारने ठाणे आणि मुलुंडदरम्यान नव्या रेल्वे स्थानकाच्या निर्मितीसाठी ठाणे मनोरुग्णालयाची जागा आरक्षित केली आहे. मात्र, मनोरुग्णालयाच्या जागेच्या बदल्यात तेवढीच जागा आणि सुसज्ज रुग्णालय बांधून देण्याबाबत कोणतीही लेखी हमी नगरविकास विभागाने आरोग्य विभागाला दिलेली नाही. त्यामुळे मनोरुग्णालयाचे भवितव्य वाऱ्यावर सोडलं आहे.

नगरविकासमंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा येणारा ताण कमी करण्यासाठी ठाणे व मुलुंडदरम्यान नवे रेल्वे स्थानक उभारण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आग्रही होते. आता महाविकास आघाडी सरकारने ठाणे आणि मुलुंडदरम्यान नव्या रेल्वे स्थानकाच्या निर्मितीसाठी ठाणे मनोरुग्णालयाच्या १४.८३ एकर भूखंडावरील आरक्षणात बदल केला आहे. आरोग्यमंत्री असताना शिंदे यांनी नियोजित रेल्वे स्थानकासाठी मनोरुग्णालयाची जागा घेताना त्याबदल्यात ठाणे येथे अन्यत्र १४.८३ एकर जागा देऊन सुसज्ज मनोरुग्णालय बांधून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, महाविकास आघाडी सरकारने आदेश जारी करताना मनोरुग्णालयाच्या जागेच्या बदल्यात तेवढीच जागा आणि सुसज्ज रुग्णालय बांधून देण्याबाबत कोणतीही लेखी हमी नगरविकास विभागाने आरोग्य विभागाला दिलेली नाही. त्यामुळे मनोरुग्णालयाचे भवितव्य वाऱ्यावर सोडलं आहे.

आरोग्य विभागाने सरकारला विस्तारित रेल्वे स्थानकासाठी जागा हवी असेल तर आरोग्य विभागाला मनोरुग्णालयासाठी जागा देण्याबरोबरच सुसज्ज मनोरुग्णालय बांधून देणे, तसेच जिल्हा रुग्णालय आणि सामान्य रुग्णालय बांधून देण्याची स्पष्ट भूमिका घेतली होती. यासह आरोग्य विभागाला या जागेचा मोबदला बाजारभावाने मिळाला पाहिजे, अशी भूमिका मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने अहवालात घेतली.

- Advertisement -

१८ फेब्रुवारी रोजी राज्याच्या नगरविकास खात्याने मनोरुग्णालयाच्या भूखंडावरील आरक्षण बदलाची अधिसूचनाही जारी केली. याआधी हा भूखंड ठाणे मनोरुग्णालय, पंपींग स्टेशन, पालिका प्राथमिक आणि माध्यमिक शाळा यासाठी आरक्षित होता. आता हा भूखंड नव्या अधिसूचनेनुसार रेल्वे स्थानक, बस टर्मिनस आणि १२, १८ व २४ मीटर रुंदीचे तीन सार्वजनिक रस्ते यासाठी आरक्षित करण्यात आले आहे.

एका दानशूर व्यक्तीने दिलेल्या जमिनीवर १९०१ सालापासून हे रुग्णालय अस्तित्वात आहे. ठाणे मनोरुग्णालयाची एकूण ६६ एकर जागा आहे. यामधील १४.८३ एकर जागेवरील आरक्षणात बदल करण्यात आला असून साडेचार एकर जागेवर अतिक्रमण करत तिथे ९९३ झोपडय़ा आहेत. यापैकी ७२३ पात्र ठरविण्यात आल्या आहेत. याशिवाय कर्मचारी वसाहती व रुग्णालयाच्या इमारती आहेत.

- Advertisement -

“मनोरुग्णालयाच्या जागा आरक्षित केली असली तरी आमची भूमिका स्पष्ट आहे. आरोग्य विभागाची जेवढी जागा जाणार आहे तेवढ्या जागेवर आम्हाला नवीन सुसज्ज मनोरुग्णालय बांधून मिळावे, अशी मागणी आम्ही केली आहे. सरकारनेही आमची भूमिका मान्य केली असून सुसज्ज मनोरुग्णालय बांधून मिळेल, अशी आम्हाला आशा आहे.”

-डॉ. प्रदीप व्यास , प्रधान सचिव, आरोग्य

“ठाणे मनोरुग्णालयाच्या आरक्षणबदलाची कोणतीही माहिती मला नसून यासंदर्भातील कोणताही विषय माझ्यासमोर आलेला नाही. केवळ राज्यातच नव्हे, तर संपूर्ण देशात मनोरुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. अशावेळी ठाणे मनोरुग्णालयाच्या जागेचे आरक्षण रेल्वे स्थानकासाठी बदलले जाणार असेल तर आरोग्य विभागाला मनोरुग्णालयाची सुसज्ज इमारत संबंधित विभागांनी बांधून देणे गरजेचे आहे. शिवाय, जागेचा योग्य मोबदलाही मिळायला हवा.”

-राजेश टोपे, आरोग्यमंत्री

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -