मुंबईत भलेही नकार, पण ठाण्यात मात्र छटपूजेला होकार!

Husband and wife doing the rituals of Chhath Puja
छट पुजेच्या विधी करताना पती पत्नी

एकीकडे मुंबई महानगर पालिकेने मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवर छटपुजेला बंदी घातली असताना दुसरीकडे ठाण्यात मात्र कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या वर्षीचे सर्वधर्मीय उत्सव साध्या पध्दतीने साजरे करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. यावर्षीचा छटपूजेचा उत्सवही अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सामुहिक छटपूजेला परवानगी न देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तरी नागरिकांनी महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन बुधवारी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.

या वर्षी कोविड या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव विचारात घेऊन गेल्या सात आठ महिन्यात आलेले सर्वधर्मिय सण-उत्सव अत्यंत साध्या पध्दतीने व लोकांनी एकत्रित न येता साजरे करण्यात आले आहेत. त्यामुळे यावर्षीचा छटपूजा सणही अन्य उत्सवांप्रमाणेच पूर्ण खबरदारी घेऊन अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करण्याचे आवाहन महापौर आणि महापालिका आयुक्तांनी केले आहे.

ठाणे शहरामध्ये उपवन तलाव, कोलशेत विसर्जन महाघाट, रायलादेवी तलाव, दत्तघाट (मासुंदा तलाव), कोपरी खाडी, पारसिक विसर्जन महाघाट, पारसिक रेतीबंदर या ठिकाणी छटपूजेसाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात आली असून उत्सव कालावधीत नागरिकांनी विशेष करुन ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालके यांनी घराबाहेर पडू नये, नागरिकांनी गर्दी करू नये तसेच मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे.