घरताज्या घडामोडीघरकामाला कोणी घेईना, नवर्‍याची नोकरी सुटली

घरकामाला कोणी घेईना, नवर्‍याची नोकरी सुटली

Subscribe

पण जिद्दीने सुरू केला मासळी विकण्याचा व्यवसाय

लॉकडाऊनने होत्याचं नव्हतं केलं, गेल्या अनेक वर्षांत एक एक करून जमवलेला बचतीचा पैसा बघता बघता संपला. कुठेच हाताला काम मिळेना आणि काम करणार्‍या पतीचाही रोजगार थांबला. घरातल्या दोन मुलींना खायला काय द्यायचं यापासून दिवसाची सुरुवात व्हायची. पण ही परिस्थिती बदलायला हवी, नक्कीच यातून वाट निघेल याच जिद्दीतून दोघा बहिणींनी मिळून मासळी विकण्याचा निर्णय लॉकडाऊनच्या काळात घेतला. आता त्यांचा रोजगाराचा प्रश्नही सुटायला सुरुवात झाली आहे आणि रोजच घरातलं अर्थचक्रही फिरायला सुरुवात झाली आहे.

माझी छोटी मुलगी अवघ्या दीड वर्षाची आहे. लॉकडाऊनमध्ये तिच्यासाठी दूध खरेदी करण्यासाठीचेही आमच्याकडे पैसे उरले नव्हते. ऐन लॉकडाऊनमध्ये पतीचे काम सुटले आणि आमचाही घरकामाचा हाऊसिंग सोसायट्या आणि बँकेतला प्रवेश बंद झाला. लॉकडाऊनमध्ये घराघरातल जेवण, धुणी भांड्याचे काम करायला सगळीकडेच नकारघंटा वाजू लागली. जितका काही बचतीतला पैसा होता त्या सगळ्याचा लॉकडाऊनमध्ये खडखडाट झाला. पोटच्या दोन छोट्या मुलींना रोज खायला काय घालायच हा प्रश्न रोजच पडायचा. कोरोनाच संकट आणि लॉकडाऊनचा काळ काही संपत नव्हता. घराबाहेर पडून कोणाकडे जाऊन काम करायची सोय नव्हती, मुळात आम्हाला दारातही उभ करून घ्यायला कोणाची मानसिकता नव्हती. पण घरात बसून काही होणार नाही, काही तरी हातपाय हलवावेच लागणार याच जिद्दीने आम्ही काही तरी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. आमच्या याच विचारातून मासळी विकायचे हे मनाशी पक्के केले. त्यामुळे आता हातावरचे पोट असा आमचा छोटा व्यवसाय सुरू झाला आहे.

- Advertisement -

माझ्या बहिणीने माझ्या घरातली नाजूक असलेली अवस्था पाहिली आणि त्यामधूनच आम्ही दोघींनी मिळून हा व्यवसाय करायचा निर्णय घेतला. आमच्या व्यवसायात आमच्या कुटुंबाचीही साथ आहे. माझे पती हे ठिकठिकाणी पीठ पोहचवण्याचे काम करतात. त्यांच्या कामावरही लॉकडाऊनमध्ये बंदी आली होती. त्यामुळे तेदेखील घरीच होते. हाताला काम नव्हते आणि होते तितके पैसे संपले होते. त्यामुळे आम्ही हा व्यवसाय सुरू केल्यानंतर त्यांनीदेखील आमच्या या व्यवसायाला हातभार लावला आहे. आमच्या व्यवसायात त्यांचीही मदत असते. आम्हा बहिणींच्या या निर्णयामुळे आमच्या दोन्ही कुटुंबांनाही आमचा आधार झाला आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये एकूणच ठप्प झालेले उत्पन्न मासळी व्यवसायाच्या निमित्ताने सुरू झाले आहे.

माहीममध्ये मोठे मासळी मार्केट आहे. त्यामुळे मासळी इतर ठिकाणाहून खरेदी करण्यावर लोकांचे प्राधान्य तसे कमीच असते. तरीही काही मासळी विकणार्‍या कोळी महिलांना आमच्या या पुढाकाराला साथ दिली. लॉकडाऊनमध्ये मासळी आणण्यासाठी अनेक अडचणी होत्या. त्यामध्ये बसमधून मासळी आणताना प्रवासाची अनेक आव्हाने होती. तर रोजची मासळी ही टॅक्सीने आणण्यासाठी परवडणारी नव्हती. त्यामुळेच काटकसर करतच मासळीचा व्यवसाय आठवड्याच्या ठराविक वारालाच करायचा असा आम्ही निर्णय घेतला. खूप असे मासे विकले जातात असे क्वचितच घडते. अन्यथा उरलेले मासे घेऊन घरी परतण्याची वेळ आम्हावर येते. अनेकदा मासे विकत घ्यायला दिवस दिवसभर ग्राहक नसतात. त्यामुळे मासे विकत घ्यायला जितक भांडवल खर्ची होते, प्रवासाला जितके पैसे लागतात तेदेखील वसूल होत नाही अशी अनेकदा स्थिती असते.

- Advertisement -

या सगळ्या आव्हानाच्या काळात मी ज्याठिकाणी बँकेत हाऊसकिपिंगचे काम करायचे त्याठिकाणच्या कर्मचार्‍यांनीही मला मदत केली. बँकेच्या बाहेरच्या बाजूला तू मासळीचा व्यवसाय कर. आम्ही नक्कीच तुला जी शक्य आहे ती मदत करू असे सांगत या सगळ्या कर्मचार्‍यांनीही मला एकप्रकारे धीरच दिला. याठिकाणी काम करणार्‍या सुरक्षा रक्षकापासून ते बँकेतील स्टाफने सगळ्यांनीच माझ्या या छोट्याशा पुढाकाला हातभार लावला आहे. या सगळ्या आव्हानाच्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी मला नव बळ मिळाले आहे.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -